Bhopal CCTV Footage News: पहिल्या नोकरीचा आनंद आपल्या मित्रांसोबत साजरा करणाऱ्या एका तरुणाची दोन पोलिसांनी जीवघेणी मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत तरुणाला नुकतीच बंगळुरूत एका आयटी कंपनीत नोकरी लागली होती. लवकरच तो नोकरीवर रुजू होणार होता. याचा आनंद मित्रांसोबत साजरा करण्यासाठी गेलेल्या या तरुणाला पोलिसांनी हटकलं आणि निर्घृण मारहाण केली. यातच या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन पोलीस हवालदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या २२ वर्षीय तरुणाचं नाव उदित गायके असं होतं. उदित बीटेक इंजिनिअर होता. नुकतंच शिक्षण संपवून त्यानं बंगळुरूतील एका कंपनीत नोकरीही मिळवली होती. पण तिथे रुजू होण्याआधीच पोलिसांच्या मारहाणीत उदितचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं त्या रात्री?

९ ऑक्टोबरच्या रात्री उदित त्याच्या मित्रांसोबत नोकरी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गेला होता. भोपाळमधील पिपलानी भागात तो त्याच्या मित्रांसोबत नाचत असताना तिथे दोन पोलीस हवालदार बाईकवर आले. त्यांनी उदित आणि त्याच्या मित्रांना हटकलं. त्यांच्यात काही चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी उदितला मारहाण करायला सुरुवात केली. स्वत:चा बचाव करण्यासाठी उदित बाजूच्या एका अरुंद गल्लीत शिरला. पोलिसांनी त्याचा तिथे पाठलाग केला आणि त्याला काठीने बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

या मारहाणीचं सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फूटेजमध्ये पोलीस उदितला काठीनं मारत असल्याचं दिसत आहे. आपल्याला जेव्हा उदितच्या मित्राचा फोन आला, तेव्हा त्यानं फक्त तातडीने एम्सला जायला सांगितलं, असं उदितचे वडिल राजकुमार गायके यांनी म्हटलं आहे.

“माझ्या मुलाची एखाद्या जनावरासारखी हत्या केली”

९ ऑक्टोबरला संध्याकाळी मुलाशी शेवटचं बोलणं झाल्याचं राजकुमार गायके म्हणाले. “काही तासांनी मला बंगळुरूतून उदितच्या एका मित्राचा फोन आला. ‘काका, भोपाळ एम्सला जा’ एवढंच तो म्हणाला. मी लगेच रुग्णालयात गेलो. तिथे मला माझ्या मुलाचा मृतदेह दिसला. त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर आणि डोळ्यांना जखमा झालेल्या दिसत होत्या. त्याची एखाद्या जनावरासारखी हत्या करण्यात आली होती”, अशा शब्दांत राजकुमार गायके यांनी घडला प्रकार सांगितला.

“आम्ही जेव्हा सीसीटीव्ही फूटेज पाहिलं, तेव्हा आम्हाला धक्का बसला. त्याला निर्घृणपणे मारहाण करण्यात आली होती. तो फार लहान होता. पोलिसांनी त्याला एकदा मारून, दम देऊन सोडून देता आलं असतं”, असं राजकुमार गायके म्हणाले.

दोन पोलिसांना १४ दिवसांची कोठडी

CCTV फूटेजच्या मदतीने भोपाळ पोलिसांनी उदितला मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांची ओळख निश्चित केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बामनिया आणि सौरभ आर्या अशी त्या दोन पोलिसांची नावं आहेत. रविवारी १२ ऑक्टोबर रोजी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहेत.