गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय.

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी मालिया मियाणामधून ६०० कोटी रुपयांचे १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणाचं ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत (Khalid Bakhsh) आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आल्याचंही बोललं जातंय. याबाबत पोलीस महासंचालक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.

गुजरात एटीएसने या प्रकरणी ड्रग्जसोबत ४ जणांना अटक केलीय. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचंही समोर येत आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचं कनेक्शन पाकिस्तानसोबतच दुबईशी देखील असल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचा माफिया खालिदने भारतातील जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कँटीनमध्ये भेट घेतली होती, अशीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा : गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रानं…, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

याआधीही पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीचे प्रयत्न

विशेष म्हणजे याआधी देखील पाकिस्तानमधील ड्रग माफिया खालिदने भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न केलेत. या आठवड्यातच गुजरातमध्ये पोलिसांनी द्वारका आणि सूरतमध्ये हेरॉइनसह अनेक अमली पदार्थ जप्त केले. या काळात ३ आरोपींना अटकही झालीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारकामध्ये एका तस्कराकडून 17 किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत 88.25 कोटी रुपये होती.

अदानी बंदरावरही मोठा ड्रग्ज साठा जप्त, प्रकरण नेमकं काय?

सप्टेंबर २०२१ मध्ये गुजरातमधील अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या मुंद्रा बंदरावर जवळपास ३,००० किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. ज्या जहाजात या ड्रग्जची तस्करी करण्यात आली त्या जहाजात प्रक्रिया न केलेली टाल्क पावडर असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात टाल्क पावडरच्या बॅगमध्ये हेरॉईन लपवून त्यावर टाल्क पावडरचं आवरण देण्यात आलं होतं. जेणेकरुन तपास यंत्रणांना या ड्रग्जचा तपास लागणार नाही.

इतकं करूनही हा मोठा ड्रग्ज साठा पकडण्यात यश आलं. यानंतर देशभरात ठिकठिकाणी या संदर्भात छापेमारी झाली. यात ८ जणांना अटक करण्यात आलं. त्यात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे.

या प्रकरणात आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केलीय. २१ सप्टेंबरला दिल्लीत एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आलीय. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसोबत अटक करण्यात आली होती. त्यांचा गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का हेही तपासलं जात आहे.

अदानी बंदरावर ड्रग्ज घेऊन आलेलं जहाज कोठून आलं?

कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी सापडलेली ही ३,००० किलोग्रॅम ड्रग्जची खेप मुळात अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आलं. इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन २ कंटेनर भारतात पाठवण्यात आले होते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स (Semi processed talk stones) असल्याचं भासवत ही मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली. मात्र, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या तस्करीवर कारवाई केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big action of gujrat ats on drugs smuggling from pakistan worth rs 600 crore pbs

ताज्या बातम्या