नुकत्याच जाहीर एका अहवालात देशातील करोना मृत्यूंबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात सर्वाधिक माहिती लपवल्याचा ठपका गुजरातवर ठेवण्यात आलाय. गुजरात राज्यात सरकारी आकडेवारीपेक्षा ५ हजार ७२२ टक्के म्हणजेच ५७ पटीपेक्षा अधिक करोना मृत्यू झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडालीय. गुजरातशिवाय देशातील इतर राज्यांचं देखील या अहवालात विश्लेषण करण्यात आलंय. गुजरातनंतर राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो आहे. या राज्यांमध्ये देखील सरकारने सांगितलेल्या करोना मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.

करोना मृत्यूबाबत महत्त्वाचे खुलासे करणारा हा अहवाल ‘जीवन रक्षा’ प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आला. यात मागील ३ महिन्यांचा दरमहा आणि राज्यनिहाय करोना मृत्यू आणि आरोग्य विमा दाव्यांची संख्या यांचा अभ्यास करण्यात आला. यात सार्वजनिक व खासगी दोन्ही विमा कंपन्यांच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ च्या आकडेवारीचा उपयोग करण्यात आला. या अभ्यासात अनेक राज्यांनी करोना मृत्यूंच्या वास्तव आकड्यांपेक्षा खूप कमी मृत्यू नोंदवल्याचं सांगण्यात आलंय.

सौजन्य : जीवन रक्षा प्रकल्प

राजस्थानमध्ये सरकारने सांगितलेल्या करोना मृत्यूंपेक्षा ४७३ टक्के म्हणजेच ४.७ पट अधिक करोना मृत्यू झालेत. झारखंडमध्ये ४६४ टक्के म्हणजेच ४.६ पट अधिक मृत्यू झालेत, तर उत्तर प्रदेशमध्ये २२८ टक्के म्हणजेच २.२ पट अधिक मृत्यू झालेत, असं या अहवालात म्हटलं आहे. गुजरातमध्ये राज्य सरकारने मागील ३ महिन्यात केवळ २३ करोना मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात याच काळात करोनामुळे मृत्यूनंतर विमा दावा करण्यासाठी १ हजार ३१६ जणांनी दावे दाखल केले. अशीच स्थिती कमीअधिक फरकाने इतर राज्यांची आहे.

महाराष्ट्रात करोना मृत्यू नोंदीची स्थिती कशी?

महाराष्ट्रात करोना मृत्यूंच्या नोंदीचं प्रमाण गुजरातच्या तुलनेत खूप चांगलं असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रात सरकारने मागील ३ महिन्यात एकूण करोना मृत्यूंची संख्या १७ हजार १२२ असल्याचं सांगितलंय. प्रत्यक्षात करोना मृत्यूनंतरच्या दाव्यांची संख्या केवळ ५११८ इतकी आहे. त्यामुळे सरकारी करोना मृत्यू आणि विमा दावे यातील फरक केवळ ३० टक्के इतका आहे.

जीवन रक्षा प्रकल्पाचे समन्वयक म्हैसूर संजीव म्हणाले, “अनेक राज्यांनी करोना रुग्णसंख्या आणि मृत्यू कृत्रिमरित्या कमी केल्याचं दिसत आहे. हे प्रमाण मागील ३ महिन्यात अधिक दिसत आहे.”

करोना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांच्या मदतीचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

करोना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने ही ५० हजार रुपयांच्या मदतीची रक्कम घोषित केलीय. यामुळे आगामी काळात करोना मृत्यूचे आकडे अधिक प्रमाणात समोर येऊ शकतात, असंही निरीक्षण संजीव यांनी मांडलंय.

हेही वाचा : राज्यात मृतांचा आकडा वाढला; दिवसभरात ९० मृत्यू, एकूण संख्या १ लाख ३९ हजार ३६२ वर!

उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आकडे लपवण्याचं प्रमाण कमी

आकडेवारीचा अभ्यास केला असता करोना मृत्यूंचे आकडे लपवण्याचं प्रमाण उत्तर भारतात जास्त आहे. त्या तुलनेत दक्षिण भारतात हे प्रमाण कमी आहे. कर्नाटकमध्ये करोना मृत्यू नोंदवण्याचं प्रमाण चांगलं आहे. दुसरीकडे केरळमध्ये खूप कमी प्रमाणात विम्यासाठी दावे झाल्याचं सांगण्यात आलंय. केरळमध्ये करोना मृत्यूनंतर विमा दावा करण्याचं प्रमाण केवळ २ टक्के आहे. यामुळे नागरिकांवरच अधिक आर्थिक भार पडेल, अशी भितीही व्यक्त करण्यात आलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Big claims about Covid-19 Corona deaths in India Gujarat on Top know about Maharashtra