सामान्यांना हे शीर्षक खटकू शकते. ते खटकण्यासारखेच आहे. पण शीर्षक बदलले म्हणून वस्तुस्थिती बदलणार नाही. दिल्लीची वस्तुस्थिती हीच आहे. एरव्ही गुण्यागोविंदाने आक्रमकांना सांभाळणारे दिल्लीकर निवडणूक आली की मग स्वपक्षाच्याच लोकांविरुद्ध एकवटतात. किरण बेदी भाजपमध्ये आल्या नि दिल्लीतील भाजपचा नूर पालटला. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन गोयल व किरण बेदी-खत्री हे दोन्ही तसे पंजाबी. पण सहजधारी व केशधारी शीखांना बेदी जवळच्या वाटतात. त्यामुळे दिल्लीच्या गुरुद्वारांमधून किरण बेदींचा प्रचार सुरू झाला आहे. बिच्चारे हर्षवर्धन! डॉक्टरसाब, या नावाने हर्षवर्धन दिल्लीकरांमध्ये परिचित आहेत. अवघ्या दिल्लीभर त्यांना मान, पण यंदा परिस्थिती बदलली आहे. किरण बेदींची जनमानसात क्रेझ आहे. गत निवडणुकीत संघपरिवार संपूर्ण ताकदीने हर्षवर्धनांच्या पाठिशी होते. या वेळी किरण बेदींच्या पाठिशी. तर किरण बेदी-खत्री यांच्याविषयी. त्याचे झाले असे की, किरण बेदी यांनी आपल्या निवासस्थानी ‘चाय पे चर्चा’ आयोजित केली होती. त्यात म्हणे हर्षवर्धन उशिरा पोहोचले. त्यांची वाट न पाहता बेदी मॅडम पं. पंत मार्गावरील भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे रवाना झाल्या. बेदी यांनी हर्षवर्धन यांना अजिबात महत्त्व दिली नसल्याची चर्चा दिल्लीत रंगली. खरी गंमत केली ती खासदार मनोज तिवारी यांनी. मनोज तिवारी व किरण बेदी यांच्यात एक गोष्ट समान आहे. दोन्ही नेते निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले. दोघांचेही वैशिष्टय़ म्हणजे भाजपला बिहारी व (पंजाबी) महिला नेतृत्वाची गरज निर्माण झाल्यावर यांचा पक्षप्रवेश झाला. तर मुद्दा तो नाही. बेदींच्या ‘चाय पे चर्चा’चा आहे. हर्षवर्धन येणार असल्याचे म्हणजे किरण बेदी यांना ठाऊकच नव्हते. म्हणून त्या घरी थांबल्या नाहीत. मनोज तिवारी तिकडे गेलेच नाहीत. ते म्हणाले, बेदी आमच्या (सर्वोच्च) नेत्या नाहीत. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो नाही. मला आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने सूचना केली नव्हती. मी वीस लाख लोकांचा (खासदार) प्रतिनिधी असल्याने मी असा कुणाकडेही जात नसतो. आता हे असं बोलल्यावर भाजपमध्ये बेदी विरोधी गटाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. अगदी तासाभरात मनोज तिवारी यांचे विधान बदलले. कारण त्यांना रामलाल यांचा संदेश आला होता. तो संदेश होता- आम्ही सांगू तेच बोला, उगाच डोकं चालवू नका. आली का पंचाईत! खरं तर बेदी मॅडमचे तिवारी यांच्याशी काहीही वैर नाही. पण हल्ली काय आहे ना, कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. त्यामुळे किमान डझनभर मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या पूर्वाचली लोकांना आपलाच मुख्यमंत्री व्हावासा वाटतो. पण पंजाबीबहुल दिल्लीकरांची मानसिकता ती नाही.  त्यामुळे तिवारी यांचा राग फुसका ठरला. या निमित्ताने एक बरे झाले, ते म्हणजे किरण बेदी यांना पक्षांतर्गत विरोधक कळाले.
चाटवाला