Bihar Assembly Election 2025 Voting and Result Date : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ व ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (६ ऑक्टोबर) नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केली. बिहारमधील एकूण २४३ जागांपैकी पहिल्या टप्प्यात १२१ तर, दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, यावेळी जम्मू काश्मीर, राजस्थान, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मिझोरम आणि ओडिशामधल्या विधानसभेच्या ८ जागांसाठी पोटनिवडणूकही त्यांनी जाहीर केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे टप्पे कमी केले जातील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीचे दोन टप्पे जाहीर केले आहेत. तसेच ते म्हणाले, १६ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल, कारण सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या २२ नोव्हेंबरला संपत आहे.

निवडणुकीबाबतचे महत्त्वाचे मुद्दे

  • बिहारची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडेल. ६ नोव्हेंबर (गुरुवार) व ११ नोव्हेंबर (मंगळवार) रोजी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली जाईल. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १६ नोव्हेंबरआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
  • पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १३ ते २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
  • १८ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. तर, २१ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.
  • पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० ऑक्टोबर तर, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २३ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल.
  • बिहारमधील विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी २०३ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर, ३८ जागा अनुसूचित जातींसाठी व दोन जागा अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

बिहारमध्ये ७.४३ कोटी मतदार

बिहारमध्ये ७.४३ कोटी अधिकृत मतदार असून यामध्ये ३.८२ कोटी पुरुष व ३.५० कोटी महिला मतदार आहेत. यासह १,७२५ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी ४ लाख मतदारांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यात १४.०१ लाख नवमतदार आहेत. म्हणजेच हे तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात १.६३ कोटी मतदार २० ते २८ वर्षे वयोगटातील आहेत.