Bihar Assembly Election 2026 Gyanesh Kumar : निवडणूक आयोगाने रविवारी (५ ऑक्टोबर) पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोगाने स्पष्ट केलं की येत्या २२ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे हा कार्यकाळ संपण्याआधी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. एसआयआर प्रक्रिया देखील यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यासाठी आयागोने बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे आभार मानले. या अधिकाऱ्यांनी एसआयआरद्वारे मतदार याद्या दुरुस्त केल्या आहेत.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले, “निवडणूक आयोगाने सुरू केलेला नवीन उपक्रम येत्या काळात संपूर्ण देशभरात राबवला जाईल. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा असून २२ नोव्हेंबरपर्यंत या सर्व जागांवरील मतदान घेऊन निकाल जाहीर केला जाईल. बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे त्याआधीच निवडणुकांचा निकाल लागेल.

निवडणूक आयोगाचं संपूर्ण पथक दोन दिवसांपासून बिहारमध्ये आहे. या दरम्यान, आमच्या पथकांनी पाटणा येथे राजकीय पक्ष, प्रशासकीय निवडणूक अधिकारी, राज्य सरकारमधील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी, अंमलबजावणी संस्था, मुख्य निवडणूक अधिकारी, विशेष पोलीस अधिकारी (नोडल) आणि केंद्र सशस्त्र पोलीस दलाच्या नोडल अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्या, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

“कोणत्याही मतदान केंद्रावर केवळ १२०० मतदार”

ज्ञानेश कुमार म्हणाले, “बूथ लेव्हल अधिकारी मतदारांकडे जातील तेव्हा मतदार त्यांना नीट ओळखू शकतील यासाठी या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना रंगीत ओळखपत्र दिलं जाईल. तसेच आता मतदान केंद्रांबाहेर मोबाइल जमा करून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याआधी मोबाईल घरी व इतरत्र कुठल्याही ठिकाणी ठेवून मतदान केंद्रावर जावं लागत होतं. तसेच सुलभतेसाठी, कुठल्याही अडथळ्याशिवाय व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पाडता यावी यासाठी कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार नसतील.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, “बिहारमध्ये वन स्टॉप डिजीटल प्लॅटफॉर्म देखील लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत बूथपासून १०० मीटर अंतरापासून उमेदवार त्यांच्या एजंटांचे स्टॉल उभे करू शकतात. प्रत्येक मतदान केंद्रावर १०० टक्के वेब कास्टिंग केलं जाईल. याआधी केवळ ५० ते ६० टक्के मतदान केंद्रांवरच वेबकास्टिंग केलं जायचं. तसेच ईव्हीएमवरील बॅलेट पेपर ब्लॅक अँड व्हाइट (केवळ काळ्या-पांढर्या रंगाचे) असायचे, त्यामुळे उमेदवार व त्याचा पक्ष ओळखणं कठीण जायचं. पंरतु, आता सीरियल नंबर व फॉन्ट रंगीत असेल. तसेच उमेदवारांचे फोटो देखील रंगीत असतील.”