वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) रविवारी जागावाटप जाहीर केले. विधानसभेच एकूण २४३ जागा असून, भारतीय जनता पक्ष व संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागा लढणार आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (राम विलास) पक्षाला २९ जागा देण्यात आल्या आहेत. विधासभा निवडणुकीत आघाडीतून संयुक्त जनता दल प्रथमच भाजपपेक्षा जास्त जागा लढवत नाही.
उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा व केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी समाजमाध्यमाद्वारे जागा वाटप जाहीर केले. सहमतीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जागावाटप करण्यात आल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.
रालोआत जागांवरून रस्सीखेच सुरू होती. दिल्लीत यावर खल सुरू होता. अखेर रविवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या म्हणजे २०२० च्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने ११५ तर भाजपने ११० जागा लढविल्या होत्या. चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढले होते. बिहारमध्ये ६ व ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान असून, १४ नोव्हेंबरला मतमोजणी आहे.
या आठवड्यात महाआघाडीचे जागावाटप
महाआघाडीचे जागावाटप या आठवड्यात निश्चित होईल असे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या सूत्रांनी नमूद केले. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी हे सोमवारी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करण्याची शक्यता आहे. जागावाटपात काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळतील मात्र गेल्या वेळी इतक्या ७० मिळणार नाही हे स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने १४४ जागा लढविल्या होत्या.
