गेल्या काही महिन्यांपासून देशात भाजपाविरोधी इतर पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न चालू आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून जसे शरद पवार, उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत, तसेच बिहारमधून नितीश कुमार, यादव परिवार, बंगालमधून ममता बॅनर्जी, खुद्द काँग्रेस, दक्षिणेतून टीआरएसचे चंद्रशेखर राव अशी अनेक नेतेमंडळी पुढाकार घेत आहेत. या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही झडत आहेत. मात्र शेवटी नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. यासंदर्भात नितीश कुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यासंदर्भात खुद्द त्यांनीच स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजकीय भेटी आणि चर्चा!
बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी सोमवारी दोन बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यात पहिल्या होत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, तर दुसरे होते समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव. यावेळी नितीश कुमार यांच्यासमवेत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यांच्या राजदचे नेते तेजस्वी प्रसाद यादव हेही होते. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्याशी झालेल्या चर्चेत तिन्ही नेत्यांनी विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तिघांनीही तशी ग्वाहीच दिली.
ममता बॅनर्जींचा पाठिंबा!
एकीकडे विरोधकांच्या आघाडीची चर्चा चालू असताना दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या स्वतंत्र अजेंड्यामुळे विरोधकांची चिंता वाढली होती. ममता बॅनर्जी विरोधकांच्या आघाडीत सामील होतील की नाही? झाल्या तर त्यांच्या काय अटी असतील? यावर चर्चा चालू होती. शरद पवारांनीही याआधी ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यात तसा प्रयत्न करून पाहिला होता. मात्र, त्यानंतरही ममता बॅनर्जींची भूमिका काहीशी तटस्थच दिसत होती. नितीश कुमार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ममता बॅनर्जींनी आपण सर्व विरोधी आणि समविचारी पक्ष भाजपाविरोधात एकत्र लढतील, असं सांगितलं.
पंतप्रधानपदाचं काय?
दरम्यान, विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सर्व चर्चा एकाच मुद्द्यावर येऊन थांबत तो म्हणजे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? आपापल्या राज्यात किंवा प्रदेशात दमदार वचक असणाऱ्या पक्षांचे दमदार नेते एकत्र आल्यानंतर त्यातलं कोण पंतप्रधान होणार हा यक्षप्रश्न या आघाडीसमोर असेल. त्यात नितीश कुमार यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं. पण आता त्यांनीच आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भाजपविरोधात एकजुटीसाठी ममता-नितीश चर्चा!
तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “मला पंतप्रधान व्हायचं नाहीये. माझा तर फक्त विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालू आहे. हे मी माझ्यासाठी करत नाहीये, तर देशाच्या हितासाठी करतोय”, असं ते म्हणाले.