Bihar Class 10 Girl dies after falling from terrace : माकडाने धक्का दिल्यामुळे इयत्ता १० वीत शिकणाऱ्या मुलीचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची बातमी बिहारच्या सिवान शहरातून आली आहे. भगवानपूर हाट पोलीस ठाणे अतंर्गत येणाऱ्या माघर गावात ही घटना घडली आहे. मृत मुलीचं नाव प्रिया कुमारी असं आहे. पुढील काही दिवसांत ती दहावीची परीक्षा देणार होती. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की प्रिया घराच्या छतावर अभ्यास करत होती. त्याचवेळी माकडांची टोळी तिच्या घराच्या परिसरात दाखल झाली. माकडांची टोळी घरांच्या छतावरून उड्या मारत होती. हे पाहून प्रिया कुमारी घाबरली आणि तिने तिथून धावण्याचा प्रयत्न केला. मुलीला धावताना पाहून माकडं आक्रमक झाली आणि त्यांनी तिच्या दिशेने धाव घेतली. त्याच वेळी एका माकडाने तिला धक्का दिला, ज्यामुळे ती छतावरून खाली कोसळली.

अनेक माकडं प्रिया कुमारीच्या घराच्या छतावर दाखल झाली होती. त्याचवेळी एका माकडाने तिला धक्का दिला आणि ती छतावरून खाली कोसळली. तिच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर जखमी मुलीला घेऊन तिचे पालक रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

प्रियाच्या ‘त्या’ कृतीमुळे माकडं आक्रमक झाली

मृत प्रिया कुमारीच्या पालकांनी सांगितलं की ती घराच्या छतावर अभ्यास करत बसली होती. मध्येच ती खाली आली. घरात ओली चादर होती ती सुकवण्यासाठी छतावर घेऊन गेली. ती चादर झाडत होती, त्याचवेळी माकडांची टोळी घराच्या छतावर दाखल झाली. एकाच वेळी अनेक माकडांची टोळी पाहून प्रिया घाबरली. तर, प्रियाला चादर झाडताना पाहून माकडांना वाटलं की ती त्यांना मारण्याचा अथवा घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे माकडांनी तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे ती तिथून पळू लागली. त्याचवेळी एका माकडाने तिला धक्का दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात माकडांची दहशत

प्रियाच्या या अपघाती मृत्यूमुळे तिच्या पालकांना व नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे. तिची आई मोठ्या धक्क्यात आहे. गावातही शोकाकूल शांतता पसरली आहे. त्याचबरोबर गावातील लोक माकडांच्या दहशतीने घाबरले आहेत. याआधी देखील माकडांनी गावातील लोकांवर असे हल्ले केले आहेत. ग्रामस्थांनी याबाबत तक्रार देखील केली आहे. प्रियाच्या मृत्यूनंतर गावकरी आणि गावातील लहान मुलं घाबरली आहेत.