बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. यापूर्वी आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यापुढची बैठक १५ नोव्हेंबरला होणार आहे अशीही माहिती नितीश कुमार यांनी दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल ११ नोव्हेंबरच्या पहाटे लागला. या निकालात एनडीएलाच बहुमत मिळालं आहे. मात्र भाजपाच्या जागा वाढल्या आहेत तर जदयूच्या जागा कमी झाल्या आहेत. असं असलं तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील हे भाजपाने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरीही जदयूच्या जागा कमी झाल्याने नितीश कुमार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता बिहारमध्ये सत्ता स्थापन होताना काही नाट्यमय घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.