बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपानं, ४३ जागा जदयूनं तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, निवडणुकांचे कल हाती येत असताना सुरूवातीला आघाडीवर असलेल्या महाआघाडीची काही वेळानं पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या होती. यावेळी काँग्रेसनं एमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावर भाजपाला मदत करण्याचे गंभीर आरोप केले. तसंच यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं.
आणखी वाचा- बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री?; नितीश यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला?
“बिहार निवडणुकीत भाजपाची असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा वापर करण्याची रणनीती काही प्रमाणात यशस्वी ठरली. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी वोट-कटर ओवैसी यांच्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ओवैसी यांच्या एमआयएमनं बिहार निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे अशा १४ ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याचाच मोठा फटका काँग्रेसला बसला असल्याचं म्हटलं जात आहे.
आणखी वाचा- “भाजपा-संघाला सोडा आणि…”; नितीश कुमार यांना काँग्रेसकडून ऑफर
एनडीए, महाआघाडीत चुरस
बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं. मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे.