गायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार निवडणुकीत मैथिली ठाकूर अलीनगरच्या जागेवरुन निवडणूक लढवू शकतात. अलीनगरचे विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांचं तिकिट कापलं जाणं हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. मैथिली ठाकूर या भाजपात आल्याने त्यांच्या खांद्यावर भाजपाकडून प्रचाराची धुरा टाकली जाण्याचीही शक्यता आहे. मैथिली ठाकूर या लोकप्रिय आहेत आणि त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. याचा फायदा भाजपाला नक्कीच होऊ शकतो. बिहारच्या अलीनगरमधून जर मैथिली ठाकूर यांना तिकिट देण्यात आलं तर बिहारच्या लोकसंस्कृतीशी संबंधित प्रसिद्ध गायिका पहिल्यांदाच राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे.

मैथिली ठाकूरने काही दिवसांपूर्वीच घेतली होती विनोद तावडेंची भेट

मैथिली ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती. ज्यानंतर मैथिली ठाकूर भाजपात येतील अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. भाजपा नेत्यांशी माझी सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही एनडीएला पाठिंबा देत आहोत. मी दिल्लीत कामानिमित्त राहते. मात्र माझा आत्मा आणि माझं मन बिहारशी जोडलं गेलं आहे. मी बिहारची सेवा करु इच्छिते आणि बिहारच्या विकासात माझं योगदान असलं पाहिजे असं मला वाटतं असं मैथिली यांनी म्हटलं आहे.

विनोद तावडे यांनी मैथिलीच्या भेटीनंतर काय पोस्ट केली होती?

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि मैथिली ठाकूर यांची भेट ५ ऑक्टोबरला झाली होती. १९९५ मध्ये लालूप्रसाद यादव यांचं सरकार आल्यानंतर जी कुटुंबं बिहार सोडून गेली होती त्यापैकी एका कुटुंबातली मुलगी मैथिली ठाकूर आता बिहारच्या विकासाच्या वेगवान प्रवाहाचा भाग होऊ इच्छिते या आशयाचं ट्वीट विनोद तावडेंनी केलं होतं.

कोण आहे मैथिली ठाकूर?

मैथिली ठाकूर ही लोकप्रिय गायिका आहे. मैथिली तिच्या लोकसंगीत आणि तिच्या खास आवाजासाठी ओळखली जाते. मैथिलीच्या गाण्यांचे कार्यक्रम विदेशांतही होत असतात. २५ वर्षांची मैथिली ही सोशल मीडियावरही चांगलीच लोकप्रिय आहे. लहानपणापासूनच मैथिलीला गाणं आवडत होतं. ती पार्श्वगायिका तर आहेच. शिवाय तिने गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही घेतलं आहे. मैथिलीने आत्तापर्यंत विविध भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. तिचे वडील रमेश ठाकूर आणि आई भारती ठाकूर हे दोघंही वादक आहेत. तसंच दोघंही संगीत शिक्षक म्हणूनही काम करतात.