SIR Voters List Issue in Bihar: बिहारसह देशभरात सध्या चर्चा आहे ती मतदार याद्यांमधील घोळाची आणि त्यावरचा उपाय म्हणून आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या SIR अर्थात मतदारांच्या विशेष फेरतपासणीची. निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला विरोधकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. मात्र, तरीदेखील आयोगाने पहिला टप्पा पूर्ण केला असून लवकरच पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर SIR मुळे मतदार यादीत होणाऱ्या बदलांच्या भीतीमुळे एका ७० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.

बिहारच्या परगणा जिल्ह्यातली घटना

बिहारच्या परगणा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. कूच बेहेर भागात वास्तव्यास असणारे ७० वर्षीय खैरूल शेख यांनी बुधवारी जंतूनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कूच बेहेरमधील महाराज जितेंद्र नारायण मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात त्यांना तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत.

मतदार यादीची होती भीती!

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खैरूल शेख यांनी मतदार यादीमधील गोंधळामुळे आपलं नावच हटवलं जाण्याच्या चिंतेने आपल्याला ग्रासलं होतं, असं म्हटलं आहे. “मला असं कळलं की SIR होणार आहे. मतदार यादीत माध्या नावाच्या स्पेलिंगचा घोळ आहे. त्यामुळे मला चिंता वाटू लागली होती. म्हणून मी ते जंतूनाशक औषध प्यायलो. SIR मुळे माझं नाव मतदार यादीतून हटवलं जाईल अशी भीती मला वाटत होती”, असं खैरूल शेख म्हणाले.

मतदार यादीतील नावात कोणती चूक?

शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावाचं इंग्रजीतील स्पेलिंग Khairul Sheikh असं आहे. पण मतदार यादीमध्ये मात्र त्यांचं नाव Khoirul Sheikh असं लिहिण्यात आलं आहे. “माझ्या नावाचा हा घोळ समजल्यानंतर सगळेच म्हणायला लागले की कदाचित मी अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे मला चिंता वाटू लागली होती”, असं ते म्हणाले.

SIR च्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने पात्र मतदारांची नावं याद्यांमधून वगळण्यात येणार नाहीत असं स्पष्ट केलेलं असताना दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सातत्याने यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजपावरही सातत्याने टीका करण्यात येत आहे.