पीटीआय, पाटणा
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानासाठी आलेल्या बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी भाजपने शनिवारी केली. मतदान केंद्रांवर या महिलांचा मतदार ओळखपत्रावरील छायाचित्राबरोबर त्यांची ओळख पडताळून पाहावे असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या मागणीवर राष्ट्रीय जनता दलाने टीका केली आहे.
बिहारमध्ये नुकत्याच राबवलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेमध्ये मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला आखून दिलेल्या निकषांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाचे एक पथक दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी बुरखाधारी महिलांच्या ओळखीचा मुद्दा उपस्थित केला.
दरम्यान, राज्यात छठपूजा झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी शनिवारी केली. तर संपूर्ण राज्यात एक किंवा दोन टप्प्यांमध्येच मतदान घेतले जावे अशी मागणी भाजप आणि राजदने केली.
मतदारांची विशेषतः बुरखाधारी महिलांकडे ओळखपत्र असावे आणि त्यांची ओळख पटवल्यानंतरच त्यांना मतदान करू द्यावे, अशी आमची मागणी आहे. – दिलीप जयस्वाल, प्रदेशाध्यक्ष, भाजप