Bihar Groom Abducted: बिहारमधील गोपालगंज येथील एका लग्नात भलताच राडा झाला. बिहारमध्ये लग्न समारंभात करमणुकीसाठी ‘लौंडा डान्स’ नावाचा कार्यक्रम ठेवला जातो. गोपालगंज येथील लग्नात सदर नृत्यावरून मोठा राडा झाला. कार्यक्रम आटोपून नर्तक मंडळी घरी जाण्याच्या तयारीत होते. मात्र वऱ्हाडी मंडळी आणखी काही काळ कार्यक्रम सुरू ठेवावा, यासाठी आग्रही होते. यावरून कलाकार आणि वऱ्हाड्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. यानंतर नर्तक मंडळींनी लग्न मंडपातून थेट नवऱ्याचे अपहरण केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालगंज येथील दिघवा दुबौली गावात शुक्रवारी रात्री पारंपरिक नृत्य कार्यक्रम सुरू होता. नवरामुलगा सोनू कुमार शर्मा हा लग्नाचे विधी आटोपून लग्नानंतरच्या इतर कामात व्यस्त असताना नृत्य कार्यक्रमावरून राडा झाला.

नर्तक कार्यक्रम संपवून घरी जाऊ इच्छित होते. पण लग्नाला जमलेले पाव्हणे मंडळी कार्यक्रम आणखी काही वेळ सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. यादरम्यान पाव्हणे मंडळींनी नर्तकांना मारहाण केली. यामध्ये एक नर्तक मुस्कान किन्नरला जबर मारहाण झाल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले.

रात्री २ वाजण्याच्या सुमारास मुस्कान किन्नर नर्तकांच्या गटाला घेऊन लग्नस्थळी परतले. त्यांनी वधूच्या नातेवाईकांना मारहाण केली आणि नवरामुलगा सोनू शर्माचे अपहरण केले.

घाबरलेल्या नातेवाईकांनी याप्रकरणी तात्काळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी शोधमोहिम राबवल्यानंतर तब्बल ९ तासांनी सिवान जिल्ह्यातून नवऱ्या मुलाची सुटका करण्यात आली. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपालगंजचे पोलीस अधीक्षक अवधेश दीक्षित यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, नवऱ्यामुलाचे अपहरण झाल्याचे कळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याचा शोध घेतला. नर्तकांचे पैसे देण्यावरून लग्नघरातील नातेवाईक, वऱ्हाडी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यातून झालेल्या हाणामरीनंतर अपहरणाचा प्रकार घडला होता.