केरळच्या पलक्कड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गर्भवती हत्तीणीने स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले होते. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर संपूर्ण देशभरात या रोष व्यक्त करण्यात आला. केरळ सरकारने तात्काळ कारवाई करत या घटनेतील एका आरोपीला अटकही केली. मात्र या प्रकारानंतर माणूस मूक्या प्राण्यांबद्दल इतका क्रूर कसा वागू शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र बिहारमध्ये मोहम्मद अख्तर यांनी एक वेगळा पायंडा घालून दिला आहे. हत्तींच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या एका NGO चे मोहम्मद अख्तर प्रमुख आहेत. अख्तर यांनी आपल्या नावावर असलेली सव्वासहा एकरची जमीन मृत्यूपश्चात आपल्याजवळील दोन हत्तींच्या नावावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५० वर्षीय अख्तर बिहाररमधील जानीपूर भागात राहतात. अख्तर यांच्यासोबत मोती आणि राणी असे दोन हत्तीही राहतात. आपण लहान असताना हे दोन हत्ती आपल्याकडे आल्याचं अख्तर यांनी IANS वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. माझं बहुतांश बालपण या हत्तींसोबत खेळण्यात गेलं आहे. अख्तर बिहारमध्ये हत्तींच्या संरक्षणासाठी Asian Elephant Rehabilitation and Wildlife Animal Trust ही NGO चालवतात. आपल्यासोबत असणाऱ्या दोन हत्तींची काळजी घेण्यासाठी अख्तर यांनी आपल्या नावावर असलेली जमीन दोन हत्तींच्या नावे केली आहे. मी गेल्यानंतर त्यांची आबाळ होऊ नये, त्यांना पुरेसं अन्न मिळावं यासाठी आपण असं केल्याचं अख्तर यांनी सांगितलं.

मोती या हत्तीने एकदा आपला जीव वाचवल्याचंही अख्तर यांनी सांगितलं. “मोती एकदा आपल्या माहुतासोबत बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात गेला होता. तिकडे त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी मला तिकडे जावं लागलं. मोतीवर उपचार सुरु असताना मी एकदा तिकडेच झोपलो होतो. अचानक मोती जोरात ओरडायला लागल्यामुळे मला जाग आली. मी खिडकीबाहेर पाहिलं तेव्हा एक माणूस माझ्यावर बंदूक रोखून उभा होता, मी लगेच माझा जीव वाचवण्यासाठी तिकडून पळालो.” आपल्या परिवारापैकी काही लोकांनी तस्करांशी संगनमत करत हत्तींना मारण्याचा प्रयत्न केल्याचं अख्तर यांनी सांगितलं. अख्तर यांनी आपली जमीन दोन हत्तींच्या नावे केल्यामुळे आजही त्यांच्या परिवारातली लोकं त्यांच्यावर नाराज आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार अख्तर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar man wills his property to two elephants says one of them saved his life psd
First published on: 10-06-2020 at 15:10 IST