काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी स्थलांतराच्या मुद्द्यावर नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारच्या लोकांना त्यांच्या हनीमूनसाठी इतर राज्यांत जावे लागते, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. “बिहारमध्ये लोकांना रोजगार, शिक्षण, उपचार आणि त्यांच्या हनीमूनसाठी इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागते. राज्यात स्थलांतर ही एक मोठी समस्या आहे. नितीश सरकारच्या नेतृत्वात राज्यातील विकास रखडला आहे,” असे कन्हैया कुमार यांनी म्हटलंय.

शनिवारी तारापूरमधून बिहार पोटनिवडणुकीसाठी कन्हैया कुमा यांनी प्रचाराची सुरुवात केली. यावेळी राज्यातील स्थलांतराचा दर रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल नितीश कुमार सरकारवर हल्ला चढवला. तसेच काँग्रेससोबतची युती तोडल्याबद्दल कन्हैया यांनी जोरदार टीका केली आणि ते म्हणाले की, आरजेडीने हे लक्षात ठेवले पाहिजे की काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय देशात कोणतेही सरकार स्थापन होऊ शकत नाही.

दरम्यान, कन्हैया २५ ऑक्टोबरपर्यंत तारापुरात आणि नंतर २६-२८ ऑक्टोबरपर्यंत कुशेश्वर अस्थानामध्ये प्रचार करणार आहेत. तसेच पोटनिवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल आणि दोन्ही जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.