Bilawal Bhutto Statement On War: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधू जल करारावरील स्थगिती भारत उठवणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, पाकिस्तानमध्ये युद्धाची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी इशारा दिला आहे की, जर सिंधू जल करारावरील स्थगिती उठवली नाही, तर पाकिस्तान युद्धाद्वारे सर्व सहा नद्या ताब्यात घेईल. दरम्यान, एप्रिल २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना जबाबदार धरत १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला होता.
अमित शहा यांच्या सिंधू जल करारावरील विधानानंतर, बिलावल भुट्टो यांनी युद्धाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भारताकडे फक्त दोनच पर्याय आहेत, सिंधू जल कराराला सहमती द्या, अन्यथा पाकिस्तान आणखी एक युद्ध करेल. आम्ही सिंधू संस्कृतीचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही त्याचे रक्षण करू.”
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री राहिलेल्या भुट्टो यांनी भारताविरुद्ध पहिल्यांदाच विधान केले नाही, यापूर्वीही त्यांनी म्हटले होते की, “एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल, किंवा त्यांचे रक्त वाहेल.” दरम्यान, भुट्टो यांनी या प्रकरणी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी देखील केली आहे.
सिंधू जल करारावरील स्थगिती उठणार नाही: अमित शहा
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच सिंधू जल करारावरील स्थगिती उठवण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. शहा यांनी “सिंधू जल करार कधीही पूर्ववत होणार नाही,” असे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी पाकिस्तानात जाणारे पाणी नवीन कालव्याच्या पायाभूत सुविधांद्वारे राजस्थानसारख्या भारतीय राज्यांकडे वळवले जाईल.
पाकिस्तानी धरणांनी गाठला तळ
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मते, सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह आधीच जवळजवळ २०% कमी झाला आहे. धरणांनी तळ गाठला असून, कृषी क्षेत्राला त्याचा फटका बसत आहे.
ऑपरेशन सिंदूर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही सीमेलगतच्या शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. याला चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानचे हल्ले परतावून लावले होते.