युएईतील बीआरएस व्हेंचर्सचे अब्जाधीश अनिवासी भारतीय बी.आर.शेट्टी हे भारतभर उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण आणि विकसीत करण्यासाठी तब्बल पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. शेट्टी यांचे मुळगाव कर्नाटकातील उडप्पी हे असून ते पूर्वाश्रमीचे जनसंघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सांगितले की, या गुंतवणूकीमुळे आगामी पाच वर्षांमध्ये भारतभरातील शासनाच्या जिल्हास्तरीय व सामान्य रूग्णालयांमध्ये व्यवस्थापन व आरोग्य सुविधांची साखळी निर्माण होण्यास मदत होईल.
मी भारतासाठी पाच अब्ज डॉलर्सच्या निधीची तरतूद केली आहे. माझ्याकडे राज्य सरकाराबरोबर भागीदारीसाठी, नफ्यासाठी काम करत नसलेल्या संस्था, धार्मिक संस्था इत्यादींकडून उच्च दर्जाच्या, रास्त दरातील ज्या नियमांचे पालन करतात अशा आरोग्य सुविधांसाठी चांगले प्रस्ताव येत आहेत. दिल्ली,वाराणसी, हरिद्वार आणि बिहार या सारख्या ठिकाणी रूग्णालय उभारणीसंदर्भात आमची अगोदरच बोलणी झालेली आहे. यासाठी एकतर जमीन खरेदी केली जाईल अथवा ती सरकार किंवा अन्य भागीदारांच्या ताब्यात दिली जाईल, असेही शेट्टी म्हणाले. बिझनेस टुडेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते त्यांचे मुळगाव उडप्पी येथील शासकीय रूग्णालय अगोदरचपासून सांभाळत असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मी ७० खाटांचे सरकारी रूग्णालय घेतले आणि त्याला माता व शिशूंसाठी २०० खाटांची व्यवस्था असलेले मध्यवर्ती वातानुकूलीत असे रुग्णालय बनविले. या ठिकाणी मोफत उपचार आहेत, रूग्णालयात कुठेही कॅशिअर दिसणार नाही.
शेट्टी हे आरोग्य सुविधांच्या व्यवसायात काही नवखे नाहीत. ते युएईमधील मोठी खासगी आरोग्य सुविधा पुरवणारी कंपनी एनएमसी हेल्थकेअरचे संस्थापक आहेत. मागील ४६ वर्षांमध्ये एनएमसीने आपल्या कारभाराचा विस्तार जगभारातील १७ देशांमध्ये २०० प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरण्यापर्यंत केला आहे. यामध्ये रूग्णालये, मेडिकल सेंटर्स, प्रदीर्घ काळाच्या आरोग्य सुविधा, शस्त्रक्रिया केंद्रे, प्रजनन चिकित्सालये आणि घरगुती आरोग्य सेवांचा समावेश आहे.