Bipin Joshi Death in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू होता. मात्र, हा संघर्ष आता थांबला आहे. इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली. इस्रायल-हमासमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी कार्यक्रम तयार करत हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर या प्रस्तावावर इस्रायल-हमासने सहमती दर्शवली आणि त्यानंतर या कराराचा एक भाग म्हणून ओलिसांची सुटका करण्यात आली.

हमासने इस्रायली ओलीसांना सोमवारी मुक्त केलं, तर इस्रायलनेही हमासच्या ओलीसांची मुक्तता केली. दरम्यान, यावेळी हमासने २० जिवंत ओलीसांना सोडलं. याचवेळी हमासने चार मृत इस्रायली बंधकांची नावे जाहीर करत त्यांचे मृतदेह इस्रायलकडे सोपवले. या चार जणांच्या बळींमध्ये एकमेव हिंदू ओलीस बिपिन जोशी यांचाही समावेश आहे. बिपिन जोशी हे मूळचे नेपाळमधील आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यादरम्यान त्यांचं अपहरण झालं होतं. हल्ल्याच्या वेळी २२ वर्षांचे असलेले बिपिन जोशी हे नेपाळहून गाझा सीमेजवळील किबुट्झ अलूमिम येथे शेती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हापासून ते जिवंत असल्याचे मानले जाणारे एकमेव गैर-इस्रायली आणि एकमेव हिंदू ओलीस होते. गाझा युद्धबंदी कराराचा एक भाग म्हणून सोमवारी त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा हमासने बिपिन जोशी यांचं पार्थिव इस्रायली अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं, अशी पुष्टी नेपाळचे इस्रायलमधील राजदूत प्रसाद पंडित यांनी केली आहे. “बिपिन जोशी यांचं पार्थिव हमासने इस्रायली अधिकाऱ्यांना सुपूर्द केलं असून तेथील ते तेल अवीवमध्ये नेण्यात येत आहे”, असं पंडित यांनी म्हटलं आहे.

इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्या एफी डेफ्रिन यांनी याबाबत म्हटलं की, “हमासने बिपिन जोशींसह चार ओलिसांचे मृतदेह परत केले आहेत. बिपिन जोशी यांचे अवशेष नेपाळला परत पाठवण्यापूर्वी डीएनए चाचणी केली जाईल. नेपाळी दूतावासाच्या समन्वयाने त्यांचे अंत्यसंस्कार इस्रायलमध्ये केले जाण्याची शक्यता आहे.”