नवी दिल्ली : भाजपने पाचव्या उमेदवारी यादीत अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे. मनेका गांधी यांना उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमधून पुन्हा उमेदवारी दिली असली तरी, त्यांचे पुत्र वरुण गांधींना पिलभितमधून डच्चू देण्यात आला आहे. आपल्या विधानांनी कायम वाद ओढवून घेणाऱ्या अनंतकुमार हेगडे यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे.

भाजपविरोधात व प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या वरुण गांधींना तिकीट नाकारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे त्यांच्या पिलभित मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपने तिकीट दिले आहे. वरुण गांधी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या  गणात उतरण्याची शक्यता आहे. वाचाळ नेत्यांना उमेदवारी न देण्याचा भाजपचा निर्धार कायम असून रमेश बिधुरी, परवेश वर्मा यांच्यानंतर उत्तर कन्नड मतदारसंघातील खासदार अनंतकुमार हेगडेंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. संविधान बदलण्याची भाषा करून हेडगेंनी अलीकडेच वाद निर्माण केला होता.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : पूनम महाजन यांची उमेदवारी अजूनही अधांतरी

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांना गाझियाबादमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. मेरठचे खासदार राजेंद्र अगरवाल यांनाही आश्चर्यकारकरीत्या वगळण्यात आले असून तेथे अभिनेते अरुण गोविल यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी समाजवादी पक्षात गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा मौर्य यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनाही बिहारच्या बक्सर या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली नाही. 

नवे चेहरे..

केंद्रीयमंत्री धर्मेद्र प्रधान (संभलपूर-ओदिशा), नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र-हरियाणा), कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (तमलुक-पश्चिम बंगाल), अभिनेत्री कंगना राणौत (मंडी-हिमाचल प्रदेश), झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन (डुमका-झारखंड), जय पांडा (केंद्रपाडा-ओदिशा) भाजपमध्ये घरवापसी केलेले जगदीश शेट्टार (बेळगावी-कर्नाटक)

अरुण गोविल, कंगना मैदानात

‘रामायण’ या लोकप्रीय मालिकेत रामाची भूमिका करणारे कलाकार अरुण गोविल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ या मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे जाहीर कौतुक करणारी अभिनेत्री कंगना राणौत राजकारणाच्या रंगमंचावर उतरण्यास सिद्ध झाली आहे. तिला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघात तिकीट देण्यात आले आहे.