नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपने रविवारी १४ उमेदवारांची घोषणा केली. सदसत्वाची मुदत संपलेल्या एकाही केंद्रीय मंत्र्यांचा समावेश नाही. यामुळे लोकसभेसाठी त्यांना रिंगणात उतरवले जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अद्याप काही उमेदवारांची घोषणा अपेक्षित आहे.

उत्तर प्रदेशातून माजी केंद्रीय मंत्री आर.पीएन.सिंह तसेच सुधांशु त्रिवेदी यांना पक्षाने उमेदवारी दिली. कर्नाटकमधून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची राज्यसभेची मुदत संपत आहे. मात्र त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्याच बरोबर माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांना उत्तराखंडमधून संधी देण्यात आली नाही. दोघांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते असे सुत्रांनी स्पष्ट केले. बिहारमधील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांचेही नाव यादीत नाही. हरयाणातून माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष बरला यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकमधून नारायणसा के भडंगे तसेच छत्तीसगडमधून देवेंद्र प्रतापसिंह या जुन्या कार्यकर्त्यांना भाजपने संधी दिली आहे.

हेही वाचा >>> ‘निवडणुकीपूर्वी CAA ची अंमलबजावणी होणार’, अमित शाहांच्या घोषणेवर ओवैसींची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा कायदा धर्माला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागरिका घोष यांना राज्यसभेची उमेदवारी

कोलकाता: तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची रविवारी घोषणा केली. यात पत्रकार सागरिका घोष याखेरीज पक्षनेत्या सुष्मिता देव यांचा समावेश आहे. घोष यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केलेला नाही. दोन वेळा राज्यसभा सदस्य असलेले नदीमुल हक यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. माजी लोकसभा सदस्य व मतुआ समाजाच्या नेत्या ममता बाला ठाकूर यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. सीएएच्या मुद्दयावर भाजप मतुआ समाजाची मते आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना तृणमूल काँग्रेसने या समाजातील व्यक्तीला संधी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होईल. पाचवी जागा भाजपला मिळणार आहे.