मुख्यमंत्र्यांना सॅन्क्वेलिम मतदारसंघातून उमेदवारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४० जागा असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली होती, मात्र त्यांना पणजीतून उमेदवारी नाकारण्यात आली असून विद्यमान आमदार अतान्सिओ बाबूश मोन्सेरात यांनाच पणजीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह आणि गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपावण्यात आलेले पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सॅन्क्वेलिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनोहर अजगावकर यांना मडगावमधून, तर साविओ रॉड्रिग्ज यांना वेलिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची पत्नी दिव्या राणे यांना पोरियम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विश्वजीत राणे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते असून त्यांना वाल्पोईमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पणजीचे उमेदवार बाबूश मोन्सेरात हेही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले असून त्यांच्या पत्नीला तळेगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे. गोव्यातील काँग्रेसशी संबंधित दोन मोठ्या कुटुंबांतील या दोन्ही नेत्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी का देण्यात आली, असे विचारले असता फडणवीस यांनी सांगितले, ‘व्यावसायिक धोका लक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे. मोन्सेरात दाम्पत्य निवडून येण्याची प्रबळ शक्यता आहे. जेनिफर मोन्सेरात या विद्यमान सरकारमध्ये मंत्रीही असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.’

अनेक पक्षांचा सहभाग

यंदाची गोवा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक पक्ष सहभागी होणार आहेत. अर्रंवद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हे पक्षही यंदा निवडणूक लढवणार आहेत. आम आदमी पक्ष सर्वच ४० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तृणमूल काँग्रेसने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली आहे. काँग्रेस पक्षाने विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टीशी हातमिळवणी केली आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp announces first list of 34 candidates the late chief minister manohar parrikar son utpal parrikar akp
First published on: 21-01-2022 at 00:19 IST