Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी म्हणजेच उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त देशभरातील भाविक आणि व्हीव्हीआयपी मंडळी अयोध्येत दाखल होत आहेत. भाजपासाठी हा कार्यक्रम अतिमहत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय फळीतील अनेक नेते येथे उपस्थित राहणार आहेत. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार नसल्याचं समोर येत आहे. जे.पी.नड्डा यांनी याबाबत एक्सवर सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
शनिवारी X वर एका पोस्टमध्ये त्यांनी २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मंदिराच्या बांधकाम आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे आभार मानले. ते पोस्टमध्ये म्हणाले की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासातर्फे मला अयोध्यामध्ये श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. याबाबत मी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे आभार मानतो. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराचं भव्य निर्माण होताना पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे. मी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर लवकरच सहकुटुंब दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहे.
२२ जानेवारी रोजी दिल्लीतील झंडेलवालान् मंदिरातील प्रांगणातून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा साक्षी बनणार आहे, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामभक्तांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच केलं होतं. तसंच, प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑनलाईन दाखवण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रक्षेपण ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या ठिकाणी या स्क्रिनिंगचे आयोजन केले आहे.
१५ जोडप्यांना बहुमान
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शनिवारी १४ नावांची यादी जाहीर केली. तर, एका जोडप्याचं नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे. यजमान म्हणून ही जोडपी राम मंदिर अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विधी पार पाडणार आहेत.