“दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले,” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखामधून शिवसेनेनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याच्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावरुन राऊत यांना फटकारल्यानंतर आज शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र आता या प्रकरणावरुन आणि टीकेवरुन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला लगावलाय. भाजपाच्यावतीने त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

परमबीर सिंग प्रकरणातील याचिका सीबीआयकडे वर्ग करण्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठाने राऊत यांना फटकारलं होतं. “प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही. परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की आता त्यांना न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली आहे”, असे न्यायालयाने म्हटलं होतं.

मात्र आता यावरुन शिवसेनेनं, “न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. एका विशिष्ट विचारधारेच्या परिवाराचा ‘गुलाम’ किंवा ‘प्रचारक’ म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयास स्वतःला जुंपून घेता येणार नाही. भारतीय घटना त्यांना तशी मान्यता देत नाही, पण आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत,” अशा कठोर शब्दांमध्ये टीका केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच टीकेच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ही टीका म्हणजे राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे, असं म्हटलंय. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या टीकेची दखल घेत कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय. “केंद्र सरकारच्या हातात असलेला न्यायाचा तराजू म्हणजे चोर बाजारातून विकत आणल्याचं वक्तव्य शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत यांनी केलंय. हे वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. या वक्तव्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मी मागणी करते,” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.