लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांचा धुव्वा उडवणारी ‘मोदी लाट’ अवघ्या चार महिन्यांत ओसरू लागल्याचे चित्र मंगळवारी लागलेल्या विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणूक निकालांनी दाखवून दिले. भाजपच्या आमदारांनी खासदारकी मिळवल्यानंतर रिक्त झालेल्या २४ जागांसह नऊ राज्यांत झालेल्या ३२ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपला अवघ्या बारा जागा जिंकता आल्या. उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील स्वत:च्या ताब्यातील १३ जागांवर भाजपला पाणी सोडावे लागले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या वडोदरा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या भाजपचे मताधिक्य मात्र कमी झाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचे दावे ठोकणाऱ्या भाजपला या निकालांनी मोठा धक्का दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत बिहार, उत्तराखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांतही भाजपची कामगिरी घसरली होती. या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश (११), राजस्थान (४) आणि गुजरात (९) या राज्यांत तर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजप आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणूक झाली होती. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या ताब्यातील दहा आणि मित्र पक्ष असलेल्या अपना दलाकडील एक अशा एकूण ११ जागांपैकी आठ जागांवर समाजवादी पक्षाने विजय मिळवला. राजस्थानमध्ये तर चारपैकी अवघी एकच जागा भाजपला राखता आली. येथे तीन जागांवर विजय मिळवत काँग्रेसने बाजी मारली. तर गुजरातमध्येही भाजपकडील नऊपैकी तीन जागा काँग्रेसने स्वत:कडे खेचून घेतल्या.
या तिन्ही राज्यांतील पराभव भाजपला जिव्हारी लागणारा आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७२ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. यात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा होता. मात्र, तेथे समाजवादी पक्षाने आपली खुंटी पुन्हा बळकट केली. गुजरात आणि राजस्थान या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतील पीछेहाट भाजपसाठी धक्कादायक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp decimated in rajasthan and uttar pradesh by elections
First published on: 17-09-2014 at 03:18 IST