महेश सरलष्कर, लोकसत्ता

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या आरोपांनंतही आतापर्यंत सलामत राहिलेल्या ब्रिजभूषण सिंह यांचे उत्तर प्रदेशातील वजन त्यांना पथ्यावर पडत होते. मात्र, कुस्तीगीरांच्या पाठिशी जाट समाजातील शेतकरी आणि सामान्य नागरिक उतरल्याने त्यांचा रोष टाळण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सिंह यांच्यावरील ‘वरदहस्त’ काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

उत्तर प्रदेशातील अवध परिसरात ब्रिजभूषण अत्यंत ताकदवान नेता असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या तसेच, संघाच्या अत्यंत नजिक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आत्तापर्यंत ब्रिजभूषण यांना ‘संरक्षण’ देण्यात आले होते. ब्रिजभूषण यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फारसे चांगले संबंध नाहीत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी ब्रिजभूषण हे पक्षांतर्गत राजकारणासाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते. योगी व ब्रिजभूषण हे एकाच समाजातून आलेले असून हा समाज लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ब्रिजभूषण यांच्या पाठिशी उभा आहे. पण, महिला कुस्तीगिरांचे आंदोलन अनपेक्षितपणे व्यापक झाले असून भाजपच्या हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशातील जातीच्या समीकरणाला जबर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना आक्रमक न होण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.

महिला कुस्तीगिरांच्या मागे हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाजाने मोठी ताकद उभी केली आहे. दिल्लीच्या वेशीवर झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाबमधील शीखांप्रमाणे हरियाणातील जाट शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला जेरीला आणले होते. हरियाणामध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असून तिथे भाजपची स्थिती पूर्वी इतकी मजबूत राहिलेली नाही. महिला कुस्तीगिरांना विविध खात पंचायती, शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीमध्ये महिला पंचायत पोलिसांनी होऊ दिली नाही. शिवाय, जंतरमंतरवरील महिला कुस्तीगिरांचे आंदोलन क्रूरपणे मोडून काढले. त्यामुळे जाट समाज प्रचंड संतप्त झाला असून संभाव्य राजकीय फटका टाळण्यासाठीही ब्रिजभूषण यांना सबुराची सल्ला देण्यात आला आहे.

ब्रिजभूषण हे राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा अत्यंत प्रभावशाली असून किमान १०-१२ विधानसभा मतदारसंघांतील निकाल एकहाती फिरवण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. पण, आता ब्रिजभूषण यांना उघडपणे पाठिंबा देता येणार नाही याची जाणीव भाजपला झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद योगींकडे असून ते ब्रिजभूषण यांच्या पाठिशी असणाऱ्या आपल्या समाजाच्या दिग्गजांना समजावून सांगू शकतात. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्यावर फौजदारी कारवाई झाली तरी, होणारे संभाव्य राजकीय नुकसान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नियंत्रणात आणू शकतील असा कयास बांधला जात आहे.

१९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे कुस्तीगिरांना आवाहन

इंग्लंडमध्ये झालेल्या १९८३च्या एकदिवसीय विश्वचषकाचे ऐतिहासिक विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील सदस्यांनी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भारतीय कुस्तीगिरांना पाठिंबा जाहीर केला. कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका, असे आवाहनही यावेळी माजी क्रिकेटपटूंनी कुस्तीगिरांना केले आहे.

‘ऑलिम्पिक पदकविजेत्या कुस्तीगिरांना दिलेल्या वागणुकीने आम्ही व्यथित झालो आहोत. ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे. मात्र, भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा. खेळाडूंचे प्रश्न चर्चेने सोडवले जाऊ शकतात अशी आशा बाळगून कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नका,’ असे विश्वविजेत्या संघातील सदस्यांनी संयुक्तपणे काढलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘मी या संदर्भात वैयक्तिक मत व्यक्त करणार नाही. आमच्या विश्वविजयी संघातील खेळाडूंनी हे एकत्रित निवेदन दिले आहे,’ असे या संघाचा कर्णधार कपिल देव म्हणाला.

विश्वचषक विजेत्या संघापूर्वी अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, इरफान पठाण या माजी क्रिकेटपटूंनीही कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि नेमबाज अभिनव बिंद्रा हेदेखील कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.