BJP leader arrested after he abuses and forces man to kneel and apologies Viral video : एका स्थानिक भाजपा नेत्याने पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीला शिवीगाळ करत धमकावल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता मेरठ पोलिसांनी या भाजपा नेत्याला अटक केली आहे. हा वाद मेरठमधील एका स्थानिक हॉटेलजवळ झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव विकुल चापराना (२८) असे असून तो भाजपाच्या किसान मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, विकुल एका व्यक्तीला शिवीगाळ करताना आणि हात जोडून माफी मागण्यास सांगताना दिसत आहे. इतकेच नाही तर समोरची व्यक्ती जेव्हा गुडघे टेकतो, तेव्हा तो त्याला ‘हात जोडून माफी माग’, असे ओरडताना आणि शिवीगाळ करताना देखील ऐकू येत आहे.

नेमकं काय झालं?

मेरठचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली आणि त्या व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली आहे. “एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन गट एकमेकांशी भांडत होते. एक गट दुसऱ्याला शिवीगाळ करत असल्याचेही दिसून आले. ही घटना मेडिकल नगर पोलीस ठाण्याच्या भागात झाल्याचे सांगितले जातो,” असे सिंह म्हणाले.

तसेच पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, “मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.” मेरठ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२) आणि ३५१ (२) अंतर्गत पीडित व्यक्तीचा लहान भाऊ आणि नोएडा येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या आदित्य रस्तोगी यांच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आदित्य यांनी आरोप केला आहे की, “रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माझा भाऊ सत्यम रस्तोगी आणि त्याचे काही मित्र मेरठमधील तेजगढी चौकाच्या जवळ पंजाबी तडका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते…. तेथे विकुल चापराना यांच्याशी वाद झाला… त्यांनी त्यांच्या मित्रासह माझ्या भावाला आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली… त्यांच्या मित्रांनी धमकी देत गैरवर्तन केले.”

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मेडिकल कॉलेज पोलीस ठाण्याचे एसएचओ शैलेश कुमार म्हणाले की, जेथे विकुल यांनी सत्यम यांना त्यांची कार काढण्यासा सांगितल्यानंतर हा वाद पार्किंगच्या मुद्द्यावरून सुरू झाला. “… त्यांच्यात वाद सुरू झाला, त्यानंतर एक पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला,” असे एसएतओ म्हणाले.

मेरठचे भाजपाचे जिल्हा महानगर अध्यक्ष, विवेक रस्तोगी यांनी पुष्टी केली की, विकुल हे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. “आम्ही व्हिडीओ पाहिला आणि तो दुर्दैवी आहे. पक्ष असे वर्तन स्वीकारणार नाही. आम्ही या घटनेबद्दल वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल,” असे ते द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.