BJP Leader Bhaskar Rao Praises Lawyer Rakesh Kishore Who Threw Shoes At CJI B. R. Gavai: भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत देशभरातून टीका होत असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या वकिलाच्या प्रयत्नाचे भाजपा नेत्याने कौतुक केले आहे. कर्नाटक भाजपाचे नेते आणि बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त भास्कर राव म्हणाले की, “त्यांनी भूमिका घेतली आणि ते त्यानुसार वागले, त्यांच्या या धाडसाचे कौतुक आहे.”

या वयातही परिणामांची पर्वा…

“जरी हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आणि भयंकर असले, तरी तुम्ही या वयातही परिणामांची पर्वा न करता भूमिका घेण्याचे आणि त्यानुसार वागण्याच्या तुमच्या धाडसाचे मला कौतुक आहे”, असे भाजपा नेते भास्कर राव यांनी हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटले. विशेष म्हणजे भास्कर राव बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आहेत.

भाजपा नेत्यावर काँग्रेसची टीका

भास्कर राव यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्याबाबत ‘एक्स’वर केलेल्या या संतापजनक विधानानंतर काँग्रेस नेते मन्सूर खान यांनी यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “हा प्रकार कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आणि भयंकर आहे, तरी तुम्ही त्यांच्या धाडसाचे कौतुक करता? माजी आयपीएस अधिकाऱ्याने अशा प्रकारे बोलणे लज्जास्पद आहे. तुम्ही एकेकाळी कायद्याचे रक्षण केले आहे, आता तुम्ही अशा व्यक्तीच्या बाजूने उभे आहात, ज्याने भारताच्या सरन्यायाधीशांचा अपमान केला. हे किती मोठे पतन आहे.”

बी. आर. गवई यांच्या टिप्पणीमुळे दुखावल्याचा दावा

दरम्यान, वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या त्यांच्या कृतीचे समर्थन केले आणि मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या टिप्पणीमुळे ते दुखावले असल्याचे म्हटले.

हे मी केले नाही, देवाने केले

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत बोलताना वकील राकेश किशोर यांनी त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. “हे मी केले नाही, हे देवाने केले आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी सनातन धर्माची थट्टा केली. हा देवाचा आदेश होता, कृतीची प्रतिक्रिया होती”, असे ते म्हणाले.