दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडले. विद्यमान मुख्यमंत्र्याला अशाप्रकारे ईडीने ताब्यात घेतल्यामुळे हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या टीकेला उत्तर देत असताना भाजपाचे नेते, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही ईडीकडून चौकशी झाली असल्याचा किस्सा सांगितला. मोदींना अटकेची भीती नव्हती, त्यामुळे ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. विरोधकांना जर काहीच केले नसेल तर त्यांनी चौकशीला सामोरे जाण्यास काय हरकत आहे, असाही सवाल गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले गोपाळ शेट्टी?

गोपाळ शेट्टी म्हणाले, “पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना नऊ तास ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आलं होतं. त्यांनी नऊ तास ईडीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. माध्यमे ही बातमी दाखवत नाहीत, पण हे सत्य आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नऊ वेळा चौकशीसाठी बोलावलं, पण ते गेले नाहीत. आपण चौकशीला गेलो तर अटक होईल, ही भीती केजरीवाल यांना होती, त्यामुळेच बहुतेक ते चौकशीसाठी जाण्यास टाळाटाळ करत असावेत.”

“मोदींनी अहंकारातून…”, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केला संताप

“ज्याला कर नाही त्याला डर कशाला? विरोधक काहीही बोलत असले तरी त्याला काही महत्त्व नाही. कारण कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. हे देशाच्या संविधानाने दाखवून दिले आहे. भविष्यात संविधानाचा धाक तर उरला पाहीजे ना. कुणी म्हणेल मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी वाट्टेल ते करेन, मला कोणी विचारणार नाही. तर मग कायदा फक्त गरिबांसाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो”, असेही गोपाळ शेट्टी म्हणाले.

Video: मोदींनी ३ मिनिट ४७ सेकंदात केदारनाथ मंदिराला हातावर चालत घातली परिक्रमा? तरुणपणी असे होते मोदी?

गोपाळ शेट्टींच्या जागी पियुष गोयल यांना तिकीट

भाजपा नेते गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्याआधी याच मतदारसंघातील विधानसभेतून त्यांनी आमदारकीही भूषविली होती. उत्तर मुंबई हा भाजपासाठी सर्वात सुरक्षित असा मतदारसंघ मानला जातो. मात्र यंदा गोपाळ शेट्टी यांना बाजूला सारून केंद्रीय मंत्री गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाचा हा निर्णय मान्य करून गोपाळ शेट्टी यांनी पियुष गोयल यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.