सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक पूर्व वारे वाहू लागलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाचे अनेक नेते या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून कधी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी तर कधी इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने सध्या उत्तर प्रदेशचे दौरे करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा आपल्या कामांच्या जाहिरातींच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायत. मात्र या जाहिरातींसाठी वापरले जाणारे फोटो हे उत्तर प्रदेशमधील प्रकल्पांचे नसल्याचं प्रकरण सलग दुसऱ्यांदा समोर आलं आहे. यावरुन आता विरोधक योगी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.

प्रकरण काय?
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कामांची जाहिरात करताना बुंदेलखंडमध्ये भवानी बंधारा बांधल्याची जाहिरात करण्यात आलीय. या योजनेच्या माध्यमातून ३ हजार ८०० हेक्टर जमीन पाणलोट क्षेत्राखाली येईल आणि २० गावांमधील ८ हजार ६२ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. या पोस्टवर योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. मात्र असं असतानाच प्रकल्पाचा फोटो म्हणून वापरण्यात आलेलं धरण हे उत्तर प्रदेशमधील नसून तेलंगण- आंध्रप्रदेशच्या सीमेवरील असल्याची माहिती समोर आलीय.

नेत्यांनी केलं ट्विट…
भाजपाच्या अनेक त्यांनी याच फोटोसहीत योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याचं पहायला मिळत आहे.

१)

२)

३)

फॅक्टचेक
याच फोटोसंदर्भात आज तक या वृत्तवाहिनीने केलेल्या फॅक्टचेकमध्ये योगींच्या कामांचा पाढा वाचणाऱ्या या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला बंधारा हा श्रीशैलम बंधारा असल्याचं समोर आलंय. हा बंधारा तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे.

माजी अधिकाऱ्याने साधला निशाणा
याच प्रकरणावरुन माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या सुर्य प्रताप सिंह यांनी योगींवर निशाणा साधलाय. योगींच्या कामाचा दाखला देणारी वादात असणारी जाहिरात, त्यासंदर्भातील फॅक्टचेक आणि बंधराच्या खरा फोटो असे तीन फोटो सिंह यांनी ट्विट केलेत. “योगीजी, जेव्हा तुमच्याकडे विकास म्हणून दाखवण्यासाठी काही नसेल तेव्हा दुसऱ्या राज्यांमधील विकास आपण केलेला म्हणून दाखवायचा. तेलंगण-आंध्र प्रदेश सीमेवरील कृष्णा नदीवर असणारा श्रीशैलम बंधारा योगीजींच्या पोस्टवर बुंदेलखंडमधील ललितपुरचा भवानी बंधारा म्हणून दाखवण्यात आलाय,” असं सिंह म्हणाले आहेत. तसेच योगीजी पुन्हा पकडले गेले, कमाल आहे, असंही सिंह यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे सिंह यांनी, “पोस्टरच्या खाली सोच ईमानदार, काम दमदार असंही लिहिलं आहे,” असं एक वेगळं ट्विट हसणाऱ्या इमोंजीसहीत केलंय.

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या एका वृत्तपत्रामधील जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला शहरांचा विकास झाल्याचा फोटो हा कोलकात्यामधील एका पुलाचा असल्याचं समोर आलं होतं.