उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी शुक्रवारी आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडलं. उत्तर प्रदेशातील पूरस्थितीवरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यातील पूर पीडित नागरिक देवाच्या भरवशावर बसले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्याबाबतचं एवढं खराब नियोजन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. पण लोकप्रतिनिधींचं तोंड बंद आहे, तोंड उघडलं तर त्यांना बंडखोर म्हटलं जाईल, अशा शब्दांत बृजभूषण सिंह यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

खरं तर, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे सध्या पुराच्या विळख्यात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांची घरे, शेती पुरात बुडाली आहेत. लोकांना मदत छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. यादरम्यान, भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा- Andheri Bypoll: “पक्षाशी निष्ठावंत असलेले सगळे…” प्रचाराला सुरुवात करताच ऋतुजा लटकेंचं विधान, म्हणाल्या…

बृजभूषण सिंह म्हणाले की, “यापूर्वी राज्यात कुणाचंही सरकार असो, पूर येण्याआधी तयारीबाबत बैठका घेतल्या जायच्या. अलीकडे अशी कोणतीही बैठक घेतली असेल, असं मला वाटत नाही. पूरग्रस्त लोक केवळ देवाच्या भरवशावर बसले आहेत. पुराचं पाणी कधी आटेल आणि आमच्या अडचणी कधी कमी होतील, याची प्रतीक्षा लोक करत आहे. पुराच्या बाबबतीत एवढं खराब नियोजन मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलं नाही. वाईट याचं वाटतंय की आम्ही रडूही शकत नाही. आमच्या मनातील विचार व्यक्तही करू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाला काय सल्ला द्याल? असं विचारलं असता बृजभूषण सिंह म्हणाले की, आता सल्ला देण्याची वेळ नाही, पूर येण्याआधी सल्ला देण्याची वेळ असते. आता बोलणं पूर्णपणे बंद आहे, केवळ ऐकावं लागतं. लोकप्रतिनिधींचंही तोंड बंद आहे. तुम्ही तोंड उघडाल तर बंडखोर म्हटले जाल. सल्ला किंवा उपाय सुचवला तर कुणीही मान्य करणार नाही, अशी टीका बृजभूषण सिंग यांनी केली आहे. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.