अभिनेत्री कंगना रनौतला भाजपाने नुकतीच लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक आक्षेपार्ह पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली. त्यावरून भाजपाने सुप्रिया श्रीनेत यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता भाजपा खासदार मनोज तिवारी यांनीही काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले मनोज तिवारी?

“महिला आणि कलाकारांबद्दल काँग्रेसचे असे विचार आहेत हे पाहून मला धक्का बसला आहे. चित्रपटातील एखादी भूमिका आणि खरे जीवन यात फरक असतो. कलाकारांना चित्रपटात काम करताना अनेक भूमिका साकाराव्या लागतात. भाजपा भारतातील सर्व कलाकार आणि महिलांचा आदर करणारा पक्ष आहे”, असं तिवारी म्हणाले. दरम्यान, सोमवारी कंगनाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी अभिनेत्री कंगना रनौतचा एक फोटो आक्षेपार्ह मजकुरासह पोस्ट केला होता. त्यावर भारतीय जनता पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नेटिझन्सकडूनही श्रीनेत यांच्या या पोस्टचा समाचार घेण्यात आला. त्यानंतर मात्र ती पोस्ट हटवण्यात आली. कंगना रनौतला भाजपाने लोकसभेचे तिकिट दिले आहे. ती हिमाचल प्रदेश मधील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

काय म्हणाली कंगना?

“माझ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत मी माझ्या चित्रपटांतून महिलांच्या विविध आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.
माझ्या चित्रपटातील प्रत्येक नायिका विविध आव्हानांचा सामना करत आपला जीवनसंघर्ष करते. क्वीन, धाकड, मणिकर्णिका, चंद्रमुखी, रज्जो, थलायवी यासर्व चित्रपटांतील कथा आणि व्यक्तिरेखा महिलांच्या संघर्षगाथा आहेत.

आपण आपल्या मुलींना मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया कोणत्या परिस्थितीला तोंड देत आपला जीवनसंघर्ष करतात, या सर्वांचा विचार केला गेला पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहीजे.”

सुप्रिया श्रीनेत यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, हा वाद वाढत असताना आता सुप्रिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की “मी नेहमी महिलांचा आदर करते. मी कोणत्याही महिलांप्रती अशा पद्धतीची कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करु शकत नाही. मी काँग्रसची सोशल मीडिया प्रमुख असल्यामुळे माझ्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचा वापर एकावेळी अनेक ठिकाणी आणि अनेकजण करत असतात. त्यांच्यापैकी कोणीतरी आज माझ्या अकाऊंटवरून ही वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. जेव्हा मला याबद्दल समजलं तेव्हा लागलीच मी ती पोस्ट हटवली”.

याशिवाय, श्रीनेत यांनी या प्रकाराबद्दल तक्रार दिल्याचंही सांगितलं आहे. “सर्वांना माहिती आहे कि मी कधीही कोणावरही वयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करत नाही. हे कोणी केलंय याबद्दल मी माहिती मिळवत आहे. माझ्या अकाऊंटचा गैरवापर कोण करत आहे याचा मी शोध घेत असून माझ्या नावाचे खोटे खाते कोणी सुरु केले आणि त्यावरून आक्षेपार्ह पोस्ट कोण करत आहे, याची माहिती मिळावी म्हणून मी तक्रार दिली आहे”, अशी माहिती श्रीनेत यांनी एक्सवर एका पोस्टमधून दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांना ताबडतोब पक्षातून काढून टाकावे”

दरम्यान, याच मुद्द्यावरुन भाजपा नेते शहजाद पुनावाला आणि अमित मालवीय यांनीही सुप्रिया यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे आयटी प्रभारी अमित मालवीय म्हणाले, “कंगनावरील पोस्ट इतकी घृणास्पद आहे की काँग्रेसने एका ठिकाणी इतकी घाण कशी गोळा केली? असा प्रश्न पडतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रिया यांच्यावर कठोर कारवाई करावी. त्यांना ताबडतोब काढून टाकावे अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा”, असे मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे.