Modi Cabinet Reshuffle: नारायण राणे मोदींच्या निवासस्थानी दाखल; भागवत कराडही पोहोचले

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असल्याने दिल्लीत वेगवान घडामोडी

BJP MP Narayan Rane, Narayan Rane in Union Cabinet
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असल्याने दिल्लीत वेगवान घडामोडी

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असल्याने सध्या सर्वांचं लक्ष दिल्लीकडे आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित, रणजीत नाईक-निंबाळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा असल्याने राज्यातही जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असून नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी मोदींच्या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत.

दिल्लीमध्ये सकाळी ११.३० वाजल्यापासून नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भेटीगाठी सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. नारायण राणेंसह कपिल पाटील, भागवत कराड मोदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद निश्चित मानलं जात आहे. दरम्यान हिना गावित आणि रणजीत नाईक-निंबाळकर अद्याप भेटीसाठी पोहोचलेले नाहीत.

Modi Cabinet Reshuffle : राणे, कपिल पाटील यांची केंद्रात वर्णी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना दिल्लीत वेग आला असून सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल हे तीन केंद्रीय मंत्री तसेच, रामदास आठवले, संजय धोत्रे व रावसाहेब दानवे हे तिघे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास राज्यात शिवसेनेविरोधात भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता मानली जाते. कपिल पाटील यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा होत असली तरी, हे तिघे मंगळवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीत दाखल झालेले नव्हते.

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, जनता दलाचे (संयुक्त) लल्लन सिंह व आरसीपी सिंह, भाजपच्या रिटा बहुगुणा-जोशी, पंकज चौधरी, रामेश्वर कथेरिया, वरुण गांधी, सी. पी. जोशी, राहुल कासवान तसेच ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल आदी नेतेही मंगळवारी राजधानीत आले असून, या नेत्यांशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे समजते. काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये गेलेले जितीन प्रसाद तसेच, तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे दिनेश त्रिवेदी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना डच्चू मिळाल्याने आता केंद्रीय मंत्रिमंडळात ५२ मंत्री असून मंत्रिमंडळ विस्तारात आणखी २९ मंत्र्यांची नियुक्ती करता येऊ शकते. लोकसभा सदस्यांच्या १५ टक्के जागांइतकी मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार असून, १७-२२ नव्या मंत्र्यांना संधी मिळू शकेल. शिवसेना, अकाली दल यासारखे घटक पक्ष ‘एनडीए’तून बाहेर पडल्यानंतर रामदास आठवले वगळता सर्व मंत्री भाजपचे आहेत. मोदी सरकारमधील फेरबदलामध्ये जनता दल (सं), लोक जनशक्ती, अपना दल आदी घटक पक्षांना सामावून घेतले जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp mp narayan rane pm narendra modi likely to get ministry in union cabinet expansion sgy

ताज्या बातम्या