नवी दिल्ली : ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव पक्षप्रमुख होते, ज्यांनी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असे छातीठोकपणे सांगितले होते. शिवसेनेने बाबरी मशीद पाडण्याचे समर्थन केले होते. त्याच शिवसेनेशी काँग्रेसने आघाडी करून महाराष्ट्रात सरकार बनवले. काँग्रेसचे ‘सेक्युलॅरिझम’ कधीच संपुष्टात आले’, असा शाब्दिक हल्लाबोल करून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी लोकसभेत विरोधकांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न केलेला दिसला.
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या निशिकांत दुबे यांनी महागाईवरील चर्चेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर तोंडसुख घेतले. कुठलेही वैचारिक साम्य नसताना काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेशी आघाडी केल्याचा मुद्दा दुबे यांना उपस्थित करायचा होता. त्यावर, काँग्रेसच्या खासदारांनी, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनेही वैचारिक साम्य नसलेल्या मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’शी युती करून सत्ताही स्थापन केली होती, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर, अटकेत असलेला दहशतवादी यासिन मलिकने मेहबुबा मुफ्ती यांची बहीण रुबिना सईद यांचे अपहरण केले होते. रुबिना सईद यांनी मलिक विरोधात साक्ष दिल्यामुळे मलिकला शिक्षा झाली असल्याचा युक्तिवाद दुबेंनी केला आणि पीडीपी-भाजप युतीचे समर्थन केले.
तिवारींना कोपरखळी
भाजपच्या निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे मनीष तिवारी यांनाही टोला लगावला. लोकसभेत महागाईच्या मुद्दय़ावर तिवारी यांनी चर्चा सुरू केली. तिवारी यांच्यानंतर दुबे यांनी महागाईवर मुद्दे मांडले. तिवारी मुद्देसूद भाषण करतात. तिवारी वकील असल्याने त्यांचा युक्तिवाद अचुक असतो. पण, दुबेंचे म्हणणे होते की, यावेळी तिवारी यांना मुद्देसूद मांडणी करता आली नाही. त्यांच्या मनात वेगळे विचार होते. दोन्हीमध्ये समन्वय नसल्याने त्यांचे भाषण प्रभावी झाले नाही! काँग्रेसमध्ये मनीष तिवारी नाराज असल्याचे सातत्याचे सांगितले जात होते. या मुद्दय़ावरून दुबे यांनी अप्रत्यक्षपणे तिवारी यांना कोपरखळी मारली.
निलंबन मागे घेऊन चर्चेचा मार्ग सुकर..
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन आठवडय़ांनी सोमवारी लोकसभेत दुपारच्या सत्रात कामकाज होऊ शकले. महागाईच्या प्रश्नावर विरोधक सातत्याने चर्चा करण्याची मागणी करत होते. मात्र, केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत केंद्र सरकारने ही चर्चा टाळली होती. मात्र, सोमवारी केंद्र सरकारने विरोधकांची चर्चेची मागणी मान्य केली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह काँग्रेस, द्रमुकच्या खासदारांनीही चर्चेसाठी नोटीस दिली होती. गेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या ४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. पण, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी निलंबन मागे घेत सभागृहात महागाईवरील चर्चेचा मार्ग सुकर केला!