देशात एकीकडे करोनाने कहर केला असताना अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. एकीकडे रुग्णालयात बेड मिळावा म्हणून रुग्णांचे नातेवाईक धावाधाव करत असताना दुसरीकडे बेड मिळाल्यानंतरही व्हेटिंलेटर, ऑक्सिजन यांच्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रुग्णालयांबाहेर नातेवाईकांकडून होणारा आक्रोश हे चित्र राज्या राज्यांमध्ये दिसत आहे. दरम्यान आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला भाजपा खासदाराने दोन कानाखाली लगावण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री आणि दामोहचे खासदार प्रल्हाद सिंह पटेल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रल्हाद सिंह पटेल सरकारी रुग्णालयात दाखल आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला दोन कानाखाली लगावेन असं बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा- धक्कादायक! दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू

हा व्यक्ती प्रल्हाद सिंह पेटल यांच्याकडे रुग्णालयात ऑक्सिजन संकट निर्माण झाल्याची तक्रार करत होता. यामुळे खासदारांचा पारा चढला आणि कानाखाली लावण्याची धमकी दिली. संबंधित व्यक्तीने यावेळी वापरलेली भाषा ऐकून प्रल्हाद सिंह पटेल भडकले होते.

आणखी वाचा- Corona Crisis: सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित

करोना संकटातही प्रल्हाद सिंह पटेल गायब असल्याची टीका होऊ लागल्यानंतर ते पाहणीसाठी पोहोचले होते. गुरुवारी ते सरकारी रुग्णालयात पोहोचले असता तिथे हा प्रकार घडला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना प्रल्हाद सिंह पटेल यांनी ती व्यक्ती डॉक्टरांसाठी आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याने आपण फक्त समजावलं असं म्हटलं आहे.