गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. या विधानावर काँग्रेसने टीका केल्यानंतर आता भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही मोदींना घरचा आहेर दिला आहे. ‘दररोज नवनवीन ट्विस्ट निर्माण करण्याऐवजी थेट विकासाच्या मुद्द्यावर या. जातीयवादाने वातावरण गढूळ करण्याऐवजी चांगले राजकारण करा,’ अशा शब्दांमध्ये ‘शॉटगन’ यांनी स्वत:च्या पक्षावरच टीकेच्या फैरी झाडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आदरणीय सर, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दररोज प्रतिस्पर्ध्याविरोधात आरोपांची राळ उडवली जात आहे. या आरोपांवर विश्वास ठेवणेदेखील कठीण आहे. आता विरोधकांचे नाव पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाशी जोडणार का?’, असा प्रश्न सिन्हा यांनी ट्विट करुन उपस्थित केला. या ट्विटमध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नसला, तरीही त्यांनी ‘सर’ म्हणत पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

रविवारी मोदींनी गुजरातमध्ये एका सभेला संबोधित केले होते. त्यावेळी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला होता. जवळपास तीन तास ही गुप्त बैठक झाल्याचे म्हणत गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीदेखील उपस्थित होते.

भाजप नेतृत्त्वावर अनेकदा तोफ डागणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी, ‘जातीय राजकारण थांबवून चांगले राजकराण करा,’ असा सल्ला मोदींना दिला आहे. मोदींनी काही दिवसांपूर्वीच अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासंदर्भात भाष्य केले होते. काँग्रेसची मानसिकता मुघलांसारखी असल्याची टीकाही मोदींनी केली होती. यावरुनही सिन्हा यांनी मोदींना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. ‘निवडणुकीच्या राजकारणाला जातीयवादी फाटे फोडण्याऐवजी आपण दिलेल्या आश्वासनांबद्दल बोला. गृहबांधणी, रोजगार, आरोग्य, विकास मॉडेलबद्दल भाष्य करा,’ असे म्हणत सिन्हा यांनी पुन्हा मोदींवर शरसंधान साधले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp shatrughan sinha slams pm modi says stop communalising atmosphere talk about vikas model
First published on: 11-12-2017 at 14:54 IST