भाजपा नेत्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना संबंधित ट्वीट तात्काळ डिलीट करण्याचा आदेश दिला आहे. गोव्यातील एका रेस्तराँ प्रकरणी हे आरोप करण्यात आले आहेत. हा रेस्तराँ स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचा असून यामध्ये बेकायदेशीरपणे मद्यालय चालवलं जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. स्मृती इराणी यांनी याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोर्टाने काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांना समन्स बजावलं आहे.

काँग्रेसचे ‘ते’ नेते कोण आहेत?

दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांना ट्वीट डिलीट करण्यास सांगितलं आहे. तसंच १८ ऑगस्टला अब्रुनुकसानीच्या खटल्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जर काँग्रेस नेत्यांनी ट्वीट डिलीट केलं नाही, तर ट्विटरला हे ट्वीट काढावे लागतील असं स्पष्ट केलं आहे.

विश्लेषण: स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत?

“स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या खटला प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आम्हाला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. आम्ही कोर्टासमोर तथ्य मांडण्याची वाट पाहत आहोत. स्मृती इराणी यांनी आम्ही आव्हान देऊ आणि त्यांचे आरोप खोटे ठरवू,” असं ट्वीट जयराम रमेश यांनी केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण –

काँग्रेस नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीचं गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार (Silly Souls Cafe and Bar) नावे अवैध मद्यालय सुरु असल्याचा आरोप केला आहे. स्मृती इराणी यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून हे आरोप निराधार असून, मुलीची तसंच आपली बदनामी केली जात असल्याचं म्हटलं आहे. स्मृती इराणी यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेर काढावं अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे.

स्मृती इराणींकडून काँग्रेस नेत्यांना नोटिसा

स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना नोटिसा बजावल्या. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी त्यांनी केली. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करु असा इशारा त्यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही नोटीस महिला काँग्रेस नेत्या नेट्टा डिसूजा आणि काँग्रेस पक्षालाही पाठवण्यात आली आहे. आमच्या आशिलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचाही नोटीसमध्ये उल्लेख आहे.