काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत आहे, असं विधान राहुल गांधींनी केल्यानंतर त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या भाषणावर तीव्र आक्षेप घेतला. यासंदर्भात भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी बोलताना राहुल गांधींनाच प्रतिप्रश्न केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी आज लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर बोलताना आपली भूमिका मांडली. “यांनी मणिपूरमध्य हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.
“राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर…”
दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. स्मृती इराणींनी यावर आक्षेप घेत विरोधकांव हल्लाबोल केला. “देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेच्या हत्येबाबत बोललं गेलं. काँग्रेस पक्ष यावर टाळ्या वाजवत होता. यातून अवघ्या देशाला संदेश दिला की कुणाच्या मनात गद्दारी आहे. मणिपूर विभाजित नाही, तो आमच्या देशाचा एक भाग आहे. डीएमकेच्या एका सदस्याने तमिळनाडूत म्हटलं की भारत म्हणजे फक्त उत्तर भारत.राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर त्यांचं वक्तव्य फेटाळून दाखवावं”, असं थेट आव्हान स्मृती इराणींनी दिलं.
“काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं काश्मीरमध्ये जनमताबाबत थेट कोर्टात विधान केलं. जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर या देशाला त्यांनी सांगावं की काश्मीरला देशापासून वेगळं काढण्याच्या कारस्थानात काँग्रेसच्या त्या नेत्याचं विधान का आहे? तुम्ही अजिबात ‘इंडिया’ नाहीत”, असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या.
“यांना मणिपूरवर चर्चा नकोय कारण…”
दरम्यान, मोदींशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याशी मणिपूरवर चर्चा न करण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवरही स्मृती इराणींनी टीका केली. “हे म्हणतात मणिपूरवर चर्चा करा. देशाचे गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांनीही सांगितलं की चर्चा करा, आम्ही तयार आहोत. पण हे पळून गेले. आम्ही नव्हतो पळून गेलो. कारण काय? कारण गृहमंत्री जेव्हा बोलायला लागतील, तेव्हा यांना गप्प बसावं लागेल”, असं त्या म्हणाल्या.
“हे म्हणतात आम्ही मंत्र्यांशी बोलणार नाही. कारण मंत्र्यांच्या कार्यशैलीवर त्यांना बोलायचं नाही. बरोबर आहे. कारण त्यांचा स्वत:चा अनुभव आहे की त्यांच्याकडे शक्तीचा केंद्रबिंदू एकच होता. इथे आम्ही सगळे एकत्र जबाबदारी घेतो”, असा टोलाही इराणी यांनी लगावला.