ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रण्टचे (एआययूडीएफ) आमदार करिम उद्दीन बरभुइया यांनी भाजपासंदर्भात मोठं विधान केलं आहे. देशातील सत्ताधारी पक्ष असणारा भाजपा पुढील पाच ते सहा वर्षांत संपून जाईल असं या आमदाराने म्हटलं आहे. बिहारमधील सत्तांतर ही याची सुरुवात असल्याचा दावा करताना यापुढे लोक आता भाजपाला स्वीकारणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसामच्या विधानसभेमध्ये सोनाई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बरभुइया यांनी काँग्रेसचे अनेक नेते एआययूडीएफमध्ये दाखल होतील असा दावा केला आहे. यामध्ये अगदी काँग्रेसचे बर्पेटाचे जिल्हाध्यक्ष, राज्याचे काँग्रेस सचिव यांचाही सहभाग असेल असं बरभुइया यांनी म्हटलं आहे. एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजलम यांनी २१ एप्रिल रोजी काँग्रेसचा उल्लेख बुडणारं जहाज असा केला आहे.

भाजपाला राज्यामधून हद्दपार करण्यासाठी आमचा पक्ष पुढाकार घेईल असंही अजलम यांनी म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता पक्षाच्या आमदाराने भाजपा पुढील पाच ते सहा वर्षात संपुष्टात येईल असं विधान केलं आहे. “बिहार ही तर सुरुवात असून पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये भाजपा संपेल,” असं बरभुइया यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी रुपीन बोरा यांना काँग्रेसच्या अरुणाचल प्रदेशमधील समितीमधून हटवण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस राज्यातून नाहीशी होत असून आता एआययूडीएफचा सुवर्णकाळ येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रुक्मिणीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला होता. बर्पेटाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबदूर रहिम खान यांनी मे महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

“मी सर्वांचा मान ठेऊन माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असं म्हणत त्यांनी हा राजीनामा दिला होता. आसाम प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. याच कारणामुळे आता एआययूडीएफने राज्यात मुख्य संघर्ष हा भाजपासोबत असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will be finished in 5 to 6 years its downfall started from bihar aiudf mla scsg
First published on: 25-08-2022 at 09:01 IST