पणजी : भाजपच भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार असून; हा पक्ष जिंको अथवा हारो, पण येती अनेक दशके कुठेही जाणार नाही, असे गोवा विधानसभा निवडणुकांकरता तृणमूल काँग्रेससाठी प्रचाराचे डावपेच आखत असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

लोक भाजपला ताबडतोब फेकून देतील असा विचार करत असल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोपरखळीही मारली.

प्रशांत किशोर यांनी गोव्यातील एका खासगी बैठकीत केलेल्या या वक्तव्यांची दृश्यफीत व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ बुधवारी राज्यात झालेल्या एका खासगी बैठकीतील आहे, याला किशोर यांच्या नेतृत्वाखालील इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटीच्या (आय-पॅक) एका ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गोवा काँग्रेसने तृणमूल काँग्रेसवर ‘धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी आणि सत्ताधारी भाजपचा फायदा करून देण्यासाठी’ राज्याच्या निवडणूक रिंगणात उतरत असल्याचा आरोप केला. किशोर यांच्या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा अजेंडा उघड झाला असल्याचाही आरोप पक्षाने केला.

‘भाजप हा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे..ते जिंकोत किंवा हरोत- जसे ४० वर्षांपूर्वी काँग्रेसच्या बाबतीत होते- भाजप कुठेही जाणार नाही’, असे प्रशांत किशोर या व्हिडीओत म्हणत आहेत.

‘एकदा का तुम्ही राष्ट्रीय स्तरावर ३० टक्के मते मिळवली, की तुम्ही लगेच कुठे जात नाही. त्यामुळे, कधीही या सापळ्यात अडकू नका की लोक चिडत आहेत आणि ते मोदी यांना फेकून देतील’, असेही किशोर यांनी सांगितले.

‘राहुल गांधी यांच्या बाबतीत हीच समस्या आहे. लोक मोदींना फेकून देतील ही काही दिवसांचीच गोष्ट आहे असे त्यांना वाटते. पण तसे काहीही होत नाहीये’, असे ते राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले.