उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ आल्या आहेत. अशात अनेक नेत्यांचे पक्षांतर सुरू आहेत. तर राजकीय पक्षांनी देखील निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं म्हटलं जातंय. गेल्यावर्षी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले होते. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीत आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. या मोठ्या आणि देशव्यापी आंदोलनानंतर पहिल्यांदाच पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निडवणुकीत शेतकरी कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात हे महत्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष युती करून जास्तीत जास्त संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी त्यांची संघटना विधानसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देईल?, यासंदर्भात घोषणा केली आहे.

काल (१७ जानेवारी) केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांनी नरेश टिकैत यांची भेट घेतली. दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यापूर्वी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांनी बीकेयू अध्यक्ष नरेश टिकैत यांच्या घरी जाऊन त्यांची प्रकृती जाणून घेतल्याचे सांगण्यात येत होते. पण आता भारतीय किसान युनियन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार का?, प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले की, “माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. केंद्रीय मंत्री संजीव बल्यान माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. सर्व पक्ष आमचा पाठिंबा मागायला येतात पण यावेळी आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनात भारतीय किसान युनियनने मोठी भूमिका बजावली होती. तसेच उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांना प्रभावित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.