भारत सरकार काळा पैसा बाहेर काढण्याच्या मागावर असताना, स्वित्र्झलडने मात्र आता स्विस बँकेत खाती असलेल्या खातेदारांची नावे पुरावे असल्याशिवाय देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. स्वित्र्झलडचे राजदूत लिनस व्हॉन कास्टेलमूर यांनी सांगितले की, कर घोटाळ्याबाबत काही पुरावे असतील तर ते दिल्यास आम्ही चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहोत असे आम्ही यापूर्वीही स्पष्ट केले आहे. स्वीस बँकेत ठेवलेल्या सर्वच पैशांवर कर अदा केलेला आहे अशातला भाग नाही हे मात्र त्यांनी कबूल केले. जगाच्या अनेक देशांतील लोकांकडून स्वित्र्झलडमधील बँकेत पैसे ठेवले जात होते. खातेदारांची चोरलेली यादी सादर केली तर त्याच्या आधारे सहकार्य करता येणार नाही. भारताने चौकशी करून काही पुरावे गोळा केले असतील व ते सादर केले तर आम्ही जरूर सहकार्य करू. काळ्या पैशाबाबत भारताला असलेली चिंता आपल्याला माहीत आहे पण त्याबाबत दृष्टिकोन स्वच्छ असला पाहिजे. भूतकाळाकडे न बघता वर्तमान व भविष्याकडे बघितले तर भारताला हा प्रश्न सोडवता येईल, असे ते म्हणाले. भारतीय उद्योजक अझीम प्रेमजी यांना स्वित्र्झलडचा प्रेरणात्मक व जबाबदार नेतृत्व पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.