California : अमेरिकेमधील सॅन दिएगो किनाऱ्याजवळ एका बोटचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सॅन दिएगो किनाऱ्याजवळ एक बोट उलटली असून या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ संशयित स्थलांतरितांना घेऊन ही बोट जात होती. पण यावेळी अचानक ही बोट उलटली आणि यामध्ये दोन भारतीय मुले बेपत्ता झाले, तर तीन जणांचा मृत्यू झाला.

बेपत्ता मुलांच्या पालकांसह एकूण चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री तटरक्षक दलाने या घटनेची शोध मोहीम थांबवली. तेव्हा दोन मुलांसह सात जण बेपत्ता होते. सोमवारी सकाळी ६.३० वाजता सॅन दिएगो येथील टोरी पाइन्स स्टेट बीचजवळ एक बोट किनाऱ्यावर वाहून आल्याची बातमी तटरक्षक दलाला मिळाली. तेव्हा ही लहान बोट मेक्सिकन सीमेपासून सुमारे ३६ किलोमीटर उत्तरेस पलटी झाल्याचं वृत्त आहे. या संदर्भातील वृत्त एपीच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाने या संदर्भात एक्सवर पोस्ट केली असून त्यामध्ये म्हटलं आहे की, “या दुर्घटनेत एक भारतीय कुटुंबही आहे. दोन भारतीय मुले बेपत्ता झाले आहेत. तसेच त्यांच्या पालकांवर स्क्रिप्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला असून भारतीय कुटुंबाला सर्व आवश्यक मदत पुरवण्याबाबत सांगण्यात आलं आहे.”

कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, “बोट ज्या ठिकाणी वाहून गेली त्या जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय पासपोर्ट सापडले आहेत.” दरम्यान, बेपत्ता झालेल्या नऊ लोकांपैकी दोन जण तटरक्षक दलाला सापडले. मात्र, ते तस्करी करत असल्याचा संशय असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी स्थलांतरित अनेकदा अशा प्रकारचा मार्ग वापरतात. अमेरिकेत कडक सुरक्षा असलेल्या जमिनीच्या सीमा टाळण्यासाठी स्थलांतरित अनेकदा असा प्रवास करण्याचा धोका पत्करतात. मेक्सिकोपासून त्यांचा प्रवास सुरू करतात आणि कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरून अमेरिकेत प्रवेश करतात. एका वृत्तानुसार, गेल्या १२ महिन्यांत सॅन दिएगो मार्गे सागरी सीमा ओलांडण्याच्या १,३५४ घटना तटरक्षक दलाने नोंदवल्या आहेत.