पीटीआय, कोलकाता
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील झालेली हिंसा पूर्वनियोजित असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय संस्था आणि भाजपने बाह्य घटकांना मदत करून, घुसखोरांना चिथावणी देऊन हा तणाव उत्पन्न केला, असे त्या म्हणाल्या.

मुस्लिम नेत्यांच्या परिषदेत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलमी असा वक्फ सुधारणा कायदा लागू न करण्याचे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लगाम ठेवावा, अशी विनंती त्यांनी केली. शहा यांच्या स्वत:च्या राजकीय अजेंड्यामुळे देशाचे मोठे नुकसान होत असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. बॅनर्जी यांनी हिंसेत मृत पावलेल्यांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आणि बीएसएफच्या कृतीवर चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले.

बांगलादेशमध्ये अस्थिर स्थिती असली, तरी देशातील वक्फ सुधारणा कायद्यामुळे घुसखोरीला चालना मिळाली. या साऱ्याचा परिणाम बंगालच्या स्थिरतेवर झाला. बीएसएफमधील काही घटक, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काही केंद्रीय संस्था यांचा हिंसेला चिथावणी देण्यामध्ये सहभाग होता.

ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री

वक्फ कायद्यास विरोध; आसाममध्ये ७ अटकेत

सिलचर (आसाम) : आसाममधील कछार जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक नुमल महत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी रविवारी बेरेंगा गावातून परवानगीशिवाय सिलचर शहराकडे निषेध मोर्चा काढला आणि पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. बागडहार आणि काशीपूर भागात छापे टाकण्यात आले आणि सात जणांना अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.