अखिल भारतीय ब्राह्मण संमेलन दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. रेखा गुप्ता या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या. दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले रविंद्र इंद्रराजही या कार्यक्रमात उपस्थित होते. रेखा गुप्ता यांनी या संमेलनात केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
ब्राह्मण समाजाबाबत काय म्हणाल्या रेखा गुप्ता?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता या संमेलनात म्हणाल्या, ब्राह्मण समाजाने कायमच ज्ञान, शास्त्र आणि धर्म यांचा प्रचार केला आहे. मला तर हेच वाटतं की समाजात ज्ञानाचा दीप लावण्याचं आणि तो सातत्याने तेवत ठेवण्याचं काम ब्राह्मण समाज करतो आहे. ब्राह्मण समाज फक्त शास्त्राची पूजा करत नाही, तो त्याचा अर्थ समजून घेतो आणि भावना समजून घेत सद्भावनेचा प्रचार करतो. देश आणि समाजाच्या रक्षणात ब्राह्मणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
ब्राह्मण समाजाला आवाहन करते आहे की-रेखा गुप्ता
ब्राह्मण समाजाला मी आज आवाहन करते आहे की तुमची बहीण म्हणून मी कायमच तुमच्यासह उभी आहे. तसंच ब्राह्मण समाजाने दिलेल्या सूचनांचा मी नक्की विचार करेन. ब्राह्मण समाजाला माजी विनंती आहे की त्यांनी दिल्लीच्या विकासात मला मदत करावी. तुमच्या आशीर्वादाने मी माझी जबाबदारी पार पाडेन असंही रेखा गुप्ता आपल्या भाषणात म्हणाल्या. या संमेलनात ब्राह्मण समाजातील वक्त्यांनीही त्यांचे विचार मांडले. तसंच सांस्कृतिक गोष्टी आणि समाजसेवेबाबतचे संकल्प काय तेदेखील त्यांनी बोलून दाखवले.
रेखा गुप्ता त्यांच्या भाषणात म्हणाल्या की दिल्लीत अनेक समस्या आहेत. मागील २७ वर्षांचा बॅकलॉग आहे पण तो आपल्याला भरुन काढायचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून दिल्लीला पुढे नेण्यासाठी प्रय़त्न केले पाहिजेत. जर सगळ्यांनी मिळून दिल्लीच्या विकासासाठी योगदान दिलं पाहिजे. असंही रेखा गुप्ता म्हणाल्या.