जगभरामध्ये करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असताना दुसरीकडे ब्राझीलसारख्या मोठ्या देशामध्ये मात्र पहिल्या टप्प्यामध्ये करोनाबाधितांची संख्या मर्यादितच होती. मात्र आता ब्राझीलमध्येही करोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होऊ लागला आहे. येथे मागील २४ तासांमध्ये ३० हजारहून अधिक नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाच दिवसात करोनाचा संसर्गामुळे एक हजार ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील माहिती देशाच्या आरोग्य मंत्र्यालयानेच गुरुवारी रात्री जाहीर केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. मंगळवारपासून देशातील अनेक शहरांमधील दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर येथील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी ब्राझीलमध्ये एक हजार ४३७ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने करोनाबाधित मृतांची संख्या ३४ हजारहून अधिक झाली आहे. करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये ब्राझीलने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून ब्राझीलपेक्षा जास्त मृत्यू केवळ अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्ये झाले आहेत. तर ब्राझीलमधील करोनाबाधितांची संख्या सहा लाख १४ हजार ९४१ वर पोहचली आहे. करोनाबाधितांच्या संख्येमध्ये ब्राझील दुसऱ्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. ब्राझीलमध्ये चाचण्यांची संख्या खूप कमी असल्याने करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- ३०० हून अधिक विद्यार्थी-शिक्षकांना करोनाचा संसर्ग; शाळा सुरु करण्याचा निर्णय ‘या’ देशाला महागात पडला

बुधवारी ब्राझीलमध्ये एक हजार ३४९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. तर याच दिवशी ब्राझीलमध्ये २८ हजार ६३३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. ब्राझीलबरोबरच लॅटीन अमेरिकेतील पेरु, इक्वाडोअर, पनामासारख्या देशांमध्येही करोनाग्रस्तांची आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे.

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो हे लॉकडाउनच्या विरोधात आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बोल्सोनारो यांनी करोनासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बोल्सोनारो यांनी करोनाला अत्यंत सामान्य फ्लू म्हणत देशातील नागरिकांना अर्थव्यवस्था थांबता कामा नये असं आवाहन केलं होतं. लोक तर मरणारच पण त्यासाठी अर्थव्यवस्था बंद केली जाऊ शकत नाही असं ते म्हणाले होते.

आणखी वाचा- पाकमध्ये करोना हॉटस्पॉटच्या भागात फक्त दोन व्हेंटिलेटर, नागरिकांचे प्रचंड हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील आर्थिक परिस्थिती बिघडून नये म्हणून अनेक शहरांमध्ये दुकाने सुरु करण्यास मंगळवारपासून परवानगी देण्यात आली आहे. रिओ द जानेरिओबरोबरच अनेक शहरांमधील दुकाने सुरु झाल्यापासून करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सरकारने करोनाबाधितांची वाढती आकडेवारी आणि अर्थव्यवस्था संभाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.