Brazilian Model Larissa Reacts To Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेत हरियाणामध्ये तब्बल २५ लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधींच्या आरोपावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. मात्र, या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नवा बॉम्ब टाकत ब्राझीलमधील एका मॉडेलने हरियाणात १० वेळा मतदान केल्याचा आरोप केला. या संदर्भातील काही पुराव्यांचं सादरीकरण देखील राहुल गांधींनी केलं.

ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात १० वेळा मतदान केल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर संबंधित मॉडेल नेमकी कोण आहे? याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यानंतर आता ज्या ब्राझिलियन मॉडेलचं नाव राहुल गांधींनी घेतलं तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. लॅरिसाने व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. तसेच तिच्या फोटोबाबत तिने आश्चर्य व्यक्त केलं असून हा फोटो तिच्या सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या काळातील जुना फोटो असल्याचं तिने म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ब्राझीलच्या मॉडेलने व्हिडीओत काय म्हटलं?

“मित्रांनो, मी तुम्हाला एक विनोद सांगणार आहे. हा वेडेपणा आहे, भारतात मतदान करण्यासाठी माझा एक जुना फोटो वापरला जात आहे. कल्पना करा, जेव्हा हा फोटो काढला गेला तेव्हा मी लहान होते आणि आता तोच फोटो भारतीय मतदार म्हणून वापरला जात आहे, लोक माझ्या फोटोबद्दल वाद घालत आहेत, हे अविश्वसनीय आहे”, असं तिने म्हटलं आहे.

“भारतातील राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. माझा फोटो एका स्टॉक इमेज प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला गेला आणि माझ्या परवानगीशिवाय वापरला गेला. मी कधीही भारतात गेलेली नाही. मी एक डिजिटल इन्फ्लूएन्सर्स आहे, पण मला भारतीय लोक आवडतात”, असंही तिने म्हटलं आहे.

राहुल गांधींनी तिचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवल्यानंतर तिचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवर, विशेषतः भारतीयांकडून कमेंट्सचा पूर आला होता. बरेच जण तिच्या ओळखीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. यावर ती म्हणाली की, “भारतीय फॉलोअर्सचं माझ्या इंस्टाग्रामवर स्वागत आहे! असं दिसतं की मी आता बरेच भारतीय फॉलोअर्स मिळवले आहेत. लोक माझ्या फोटोंवर अशा कमेंट्स करत होते जणू मी निवडून आले आहे. पण स्पष्ट सांगायचं तर ती मी नव्हते, फक्त तो माझा फोटो आहे”, असं तिने म्हटलं.

“मी सर्व भारतीयांच्या प्रेमाबद्दल खरोखर आभारी आहे. मला तुमची भाषा येत नाही, पण मी खरोखर तुमची आभारी आहे”, असंही तिने म्हटलं आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये तिने असा खुलासा केला की भारतीय पत्रकार तिच्या फोटोच्या संदर्भातील प्रतिक्रिया घेण्यासाठी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. यावर तिने म्हटलं की, “काही भारतीय पत्रकार मला शोधत असून मुलाखती घेऊ इच्छित आहेत. पण मी उत्तर दिलं आहे की मी ‘ब्राझिलियन मॉडेल’ होते. मात्र, आता मॉडेलिंग करत नाही.”

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं होतं?

निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे. राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, “निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?” ते म्हणाले की, माझा एक प्रश्न आहे: हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे? हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. एका विधानसभा मतदारसंघात एका महिलेने २२ वेळा मतदान केले. या महिलेने सरस्वती, स्विटी, संगिता अशा विविध नावांनी मतदान केलं आहे. ही महिला ब्राझीलची मॉडेल असून तिचं नाव मॅथ्युस फेरारो आहे असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच त्यांनी तुम्ही या फोटोसह दिलेला कोड स्कॅन करुनही माहिती घेऊ शकता असंही सांगितलं. त्यानंतरच या महिलेबाबतची माहिती समोर आली आहे.