British Fighter Jet : केरळच्या तिरुअनंतपुरममधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्रिटिश लढाऊ विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. इंधन संपल्यामुळे ब्रिटिश एफ-३५ या लढाऊ विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश एफ-३५ हे लढाऊ विमान शनिवारी हिंदी महासागरावरून उड्डाण करत होतं. मात्र, इंधनाचा साठा कमी राहिल्यामुळे शनिवारी रात्री या विमानाचं तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आलं आहे.

या ब्रिटिश लढाऊ विमानात इंधनाचा साठा कमी असल्याचे कारण देत विमानाने तत्काळ लँडिंगची परवानगी मागितली होती. त्यानंतर परवानगी देण्यात आल्यानंतर या विमानाचं तत्काळ लँडिंग करण्यात आलं आहे. दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप या आपत्कालीन लँडिंगच्या तपशीलांवर कोणतंही निवेदन जारी केल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या हे लढाऊ विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर उभे आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, ब्रिटिश एफ-३५ या लढाऊ विमानाने विमानवाहू जहाजावरून उड्डाण केलं होतं असं सांगितलं जात आहे. वृत्तानुसार, सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली. तर त्या विमानातील वैमानिकाने कमी इंधन असल्याचं कारण सांगितलं आणि लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर तात्काळ आणि सुरक्षितरित्या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर आता हे विमान विमानतळावर पार्क करण्यात आलं असून केंद्र सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर इंधन भरल्यानंतर हे विमान उड्डाण करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.