लंडन : व्यायामशाळा, निर्जन कारखाने, खाणी, शाळा, जुने वायुनिर्मिती प्रकल्प अशा विचित्र ठिकाणांनाच रंगमंच करून तेथे नाटक सादर करण्याची किमया साध्य केलेले आणि जगातील सर्वात प्रयोगशील नाटय़दिग्दर्शकांपैकी एक असलेले पीटर ब्रुक यांचे शनिवारी पॅरीस येथे देहावसान झाले. ते ९७ वर्षांचे होते.  

ब्रुक यांनी शेक्सपियरच्या आव्हानात्मक नाटकांपासून ते महाभारताच्या नाटय़रूपांतरापर्यंतच्या प्रयोगांसाठी ‘रिकाम्या जागां’चा रंगमंच म्हणून वापर करण्याचा अफलातून आविष्कार घडवला. त्यांनी शहरांतील व्यायामशाळा, विद्यालये, कारखाने, खाणी, इतकेच नाही तर जुने वायुनिर्मिती प्रकल्प या ठिकाणांचा वापर रंगमंच म्हणून केला. 

१९७० मध्ये शेक्सपियरच्या ‘ए मिडसमर नाईटस् ड्रीम’च्या प्रयोगात संपूर्ण पांढऱ्या रंगाचे नेपथ्य आणि चमकदार रेशमी वेशभूषेतील कलावंतांनी सर्कशीतील

प्लेट-स्पिनिंग कौशल्याचा वापर करून घडवलेला अफलातून नाटय़ाविष्कारामुळे ब्रुक यांचे नाटय़ेतिहासातील स्थान निश्चित झाले. या नाटकाचे नेपथ्य सॅली जेकब्स यांनी केले होते. सुंदर जंगल आणि अथेनियन कोर्टच्या पारंपरिक ‘ड्रीम सेट’ची जागा ब्रुक यांच्या कल्पनेतून आलेल्या पांढऱ्या रंगातील नेपथ्याने घेतली. 

ब्रुक यांचा नाटय़वर्तुळात दरारा होता, मात्र त्यांनी व्यावसायिकता नाकारल्यामुळे ते या क्षेत्रात लौकिकार्थाने कमी प्रसिद्ध होते. सतत नवकल्पनांच्या शोधात असलेल्या ब्रुक यांनी आणखी काहीतरी वेगळे करण्यासाठी देश सोडला. १९७० मध्ये ब्रिटन सोडून ते पॅरिसमध्ये दाखल झाले. तेव्हापासून ते तेथेच होते. ‘ल मॉँद’ या फ्रेन्च वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ब्रुक १९७४ पासून फ्रान्समध्ये होते आणि शनिवारी पॅरिसमध्ये ते निवर्तले. ते नव्वदीतही सक्रिय होते.

प्रकाश, शब्द, इम्प्रोव्हायझेशन आणि अभिनय यांच्या संपूर्ण हुकूमतीवर रिकाम्या जागांचे रूपांतर रंगमंचात करता येऊ शकते, या विश्वासातून ब्रुक यांनी अनेकदा पारंपरिक रंगमंचांपासून अंतर राखले. ‘‘मी कोणत्याही रिकाम्या जागेला रंगमंच म्हणू शकतो,’’ असे ब्रुक यांनी १९६८ मध्ये लिहिलेल्या ‘द एम्प्टी स्पेस’ या अफलातून पुस्तकात लिहून ठेवले आहे. 

ब्रुक यांच्या नाटय़प्रेरणा नव्याच्या शोधात त्याना आफ्रिका आणि इराणपर्यंत घेऊन गेल्या. नाटय़कृतीबाबतच्या त्याच्या आव्हानात्मक आणि सखोल दृष्टिकोनामुळे मूळ नाटय़संहिता नव्या अचंबित करणाऱ्या रंगमंचीय आविष्कारात जगासमोर सादर झाल्या.  

ब्रुक यांचा जन्म २१ मार्च १९२५ रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील एका कंपनीचे संचालक होते, तर आई शास्त्रज्ञ होती. चित्रपट स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी त्यांनी १६व्या वर्षी शाळेला रामराम ठोकला आणि नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन इंग्रजी आणि परदेशी भाषांमध्ये पदवी घेतली. १९७० मध्ये पॅरिसला स्थायिक झाल्यावर त्यांनी ‘इंटरनॅशनल सेंटर ऑफ थिएटर रिसर्च’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक देशांचे कलाकार आणि नेपथ्यकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

नाटकाचा प्रत्येक प्रकार आणि आपण डॉक्टरांची घेतलेली भेट यांत एक साम्य असते. आत जाताना जे वाटते त्याहून अधिक चांगले तेथून बाहेर पडताना वाटले पाहिजे, असे त्यांनी त्यांच्या ‘टिप ऑफ टंग’ या पुस्तकात म्हटले आहे. 

जेव्हा प्रेक्षक कंटाळून भावनाशून्य शब्दपठण ऐकत बसतात, तेव्हा तो अभिनेता अपयशी ठरलेला असतो.

पीटर ब्रुक

नटांच्या आंतरिक शक्तीला पारखणारा दिग्दर्शक

पीटर ब्रुक हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक होते. त्यांच्या सात तासांच्या ‘महाभारता’च्या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर एनसीपीएत एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी त्यांची कामाची पद्धत जवळून अनुभवता आली. त्यांच्यासोबत ‘महाभारता’तील नट मंडळी होती. देशोदेशीचे हे नट त्यांनी कसे निवडले याबद्दलची उत्सुकता आम्हा सर्वाना होती. त्यांची शरीरयष्टी वा त्यांचा वर्ण यावर त्यांची निवड करण्यात आली होती का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यांचे उत्तर होते : नटांच्या बाह्य रूपापेक्षा त्यांची आंतरिक शक्ती पाहून मी त्या-त्या भूमिकेसाठी नटांची निवड केली. केवळ देशोदेशीचे नट घ्यायचे म्हणून ही निवड केलेली नव्हती. ‘महाभारता’चे संदर्भ त्यांनी वर्तमानाशी जोडले होते. आपल्या मातीतील कलाकृती एका परदेशी कलावंताला करावीशी वाटावी आणि तिचा आपल्याला पूर्णपणे वेगळय़ाच दृष्टिकोनातील वाटणारा अन्वय त्याने लावावा हे थक्क करणारे होते.

विजय केंकरे, दिग्दर्शक

 ‘महाभारताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन

पीटर ब्रुक यांचे ‘महाभारत’ नाटक मी पाहू शकले नाही, परंतु त्यांच्या एनसीपीएतील कार्यशाळेत सहभागी होण्यापूर्वी विजयाबाईंच्या (मेहता) सांगण्यावरून त्यांची ‘महाभारता’वरील फिल्म मी पाहिली होती. त्यामुळे त्या कार्यशाळेमध्ये बरेच काही शिकायला मिळाले. तो सगळा अनुभव संमोहित करणारा होता. आजही त्या कार्यशाळेचा प्रभाव माझ्यावर आहे. मी त्याआधी विजयाबाई आणि सत्यदेव दुबेंच्या कार्यशाळा केल्या होत्या. परंतु पीटर ब्रुक यांच्या कार्यशाळेचा अनुभव संपूर्णत: वेगळाच होता. त्यांच्या ‘महाभारता’ची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखवणारी कार्यशाळा होती. त्यातली नट मंडळीही त्यावेळी हजर होती. त्या नटांना ‘महाभारता’साठी तयार करताना त्यांची बलस्थाने आणि कमतरता यांचा कसा अभ्यास त्यांनी केला होता आणि त्या वैशिष्टय़ांचा त्यांनी कसा वापर केला हे या कार्यशाळेत उलगडून दाखवण्यात आले. नटांनी याबद्दलचे आपले अनुभव कथन केले आणि कशा प्रकारे इम्प्रोव्हायझेशन्सच्या तंत्राने हे महाकाव्य साकारले गेले ते सादर केले. त्या वेळी ‘महाभारता’कडे ज्या दृष्टिकोनातून पीटर ब्रुक यांनी पाहिले ते आजच्या काळात शक्य आहे का, असा प्रश्न मागे वळून पाहताना पडतो. विजयाबाई सहसा कुणाच्याही प्रभावाखाली येत नाहीत. परंतु ब्रुक आणि फ्रिट्झ बेनेव्हिट यांच्या कामाने त्या खूप प्रभावित झालेल्या जाणवतात. आम्ही ‘महासागर’, ‘सावित्री’, ‘हमिदाबाईची कोठी’ करत असताना त्या सतत पीटर ब्रुक यांच्या दृष्टिकोनाचे, त्यांच्या नाटय़ सादरीकरण पद्धतीचे दाखले आम्हाला देत. असा दिग्दर्शक आणि त्याच्या कामाची पद्धत जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचे भाग्य.

नीना कुळकर्णी, अभिनेत्री

करमणुकीपलीकडच्या रंगभूमीचा प्रवर्तक

‘महाभारत’ हा विषय रंगभूमीवर समर्थपणे आणणारा पीटर ब्रुक हा करमणुकीपलीकडच्या रंगभूमीचा (थिएटर बियाँड एन्टरटेन्मेंट अँड पर्सनल ग्रोथ) प्रवर्तक होता. त्याच्या ‘एम्प्टी स्पेस’ या पुस्तकाने अनेक रंगकर्मीप्रमाणे मलाही प्रेरणा दिली. ‘घाशीराम कोतवाल’ नाटक पाहण्यासाठी पीटर पॅरिसहून लंडनला आला होता. इतकेच नव्हे तर त्याने या नाटकाविषयीचा त्याचा अभिप्राय आम्हाला माहितीपत्रकामध्ये वापरण्यासाठी स्वयंस्फूर्तीने दिला होता. माझा आणि त्याचा व्यक्तिगत स्नेह होता. आमच्या तीन-चार वेळा भेटी झाल्या होत्या. ‘नवीन काय करतो,’ असे तो नेहमी विचारत असे. ब्रुक म्हणजे रंगभूमी क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व. १९८० मध्ये ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा प्रयोग पॅरिस येथे युनेस्कोच्या सभागृहामध्ये झाला होता. प्रयोगानंतर पीटरला या नाटकाविषयी माहिती समजली. पॅरिसनंतर ‘घाशीराम’चा चमू लंडन येथे रवाना झाला होता. त्या वेळी केवळ ‘घाशीराम’ नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी पीटर पॅरिस येथून लंडनला आला होता. प्रयोग पाहून भारावून गेलेल्या पीटरने प्रयोगानंतर आमच्याशी संवाद साधला. १९८६ मध्ये नाटकाच्या अमेरिका दौऱ्यासाठी माहितीपत्रक करण्याचे ठरले तेव्हा त्या माहितीपत्रकावर सत्यजित रे आणि पीटर ब्रुक यांचे अभिप्राय वापरण्यात आले होते. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा (एफटीआयआय) संचालक या भूमिकेतूनही माझी आणि त्यांची भेट झाली होती.

डॉ. मोहन आगाशे, अभिनेते

पीटर ब्रुक हा फारच मोठा दिग्दर्शक. महाभारत या विषयाकडे त्याने वेगळय़ा अवकाशातून पाहिले आणि त्याच समर्थपणे ते रंगभूमीवर सादर केले. या नाटकाचा प्रयोग मी पाहिला होता. नाटकातील नटसंचाने अफलातून काम केले होते.

डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

 ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’च्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी पॅरिस येथून लंडनला येण्यासाठी पीटर ब्रुक यांनी केलेली धडपड ही त्यांच्या रंगभूमीवरील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. मी त्यांचे महाभारत नाटक पाहिले आहे. त्या प्रयोगाने मी भारावून गेलो होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार